India Corona Update : दिलासादायक ! गेल्या 24 तासांत देशात दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – देशात मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. मागील 24 तासांत देशभरात दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून ही निच्चांकी रुग्ण संख्या आहे. गेल्या 24 तासांत 8 हजार 635 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 94 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 07 लाख 66 हजार 245 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 04 लाख 48 हजार 406 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 13 हजार 423 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आयसीएमआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 19 कोटी 77 लाख 52 हजार 057 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 6 लाख 59 हजार 422 नमुन्यांची तपासणी सोमवारी (दि.1) करण्यात आली आहे.

सध्या देशात 1 लाख 63 हजार 353 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात देशभरात 94 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 54 हजार 486 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌. तर, रिकव्हरी रेट 97 टक्के एवढा झाला आहे. देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत 39 लाख 50 हजार 156 जणांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.