India Corona Update: मोठी बातमी! सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर

India Corona Update: Worrying! India ranks fourth among the most corona infected countries भारतातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 49.27 टक्के, कोरोनामुक्तांचे प्रमाण 49.27 टक्के तर मृत्यूंचे प्रमाण 2.85 टक्के, परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली असल्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे भारताच्या चिंतेत अधिक भर टाकणारी बातमी हाती आली आहे. स्पेन आणि इंग्लंडला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. अमेरिका, ब्राझील व रशिया हे देश कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारताच्या खूपच पुढे आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी भारतातील कोरोना मृतांचे प्रमाण मर्यादित असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत 41 व्या क्रमांकावर असणारा भारत आता पहिल्या चार देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली. आतापर्यंत एकूण 2 लाख 98 हजार 283 कोरोनाबाधितांची भारतात नोंद झाली आहे. गेले काही दिवस दररोज सातत्याने दहा हजारांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. काल (गुरुवारी) 11 हजार 128 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

भारतात समूह संसर्ग नाही – आयसीएमआर

भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी भारतात सामूहिक कोरोना संसर्ग सुरू झालेला नाही, असे आयसीएमआरने स्पष्ट केले. भारताची लोकसंख्या मोठी आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. पण कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण तुलनेत खूप मर्यादित असल्याने देशवासीयांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची बाधा होत असली तरी त्यातील बहुतांश रुग्ण बरे झाले आहेत किंवा बरे होण्याच्या मार्गावर आहेत, याकडे आयसीएमआरच्या प्रवक्त्याने लक्ष वेधले आहे.

कोरोनामुक्तांचे प्रमाण 49.27 टक्के

भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश देताना दिसत आहे. काल देशात एकूण 5 हजार 993 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्तांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 972 झाली आहे. हे प्रमाण 49.27 टक्के आहे.

कोरोनामुक्तांचे प्रमाण 47.88 टक्के

भारतात सध्या 1 लाख 42 हजार 810 सक्रिय कोरोना रुग्ण असून ते देशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 47.88 टक्के इतके खाली आले आहे.

कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण 2.85 टक्के

देशात काल 394 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हा आतापर्यंतचा एका दिवसातील मृतांचा सर्वाधिक आकडा आहे. भारतातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 8,501 पर्यंत जाऊन पोहचला आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण 2.85 टक्के आहे. जागतिक स्तरावर हा दर सरासरी 5.58 टक्के आहे. म्हणजेच भारताचा कोरोना मृत्यूदर त्यापेक्षा जवळपास निम्मा आहे.

कोरोनाच्या 5.72 टक्के चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

भारतात आतापर्यंत 52 लाख 13 हजार 140 कोरोना चाचण्या झाल्या असून त्यापैकी 2 लाख 98 हजार 283 चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. म्हणजेच भारतातील 5.72 टक्के चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. हे प्रमाणही अन्य देशांच्या तुलनेत लक्षणीय कमी आहे. भारतात कोरोना संशयित तसेच कोरोना रुग्णाच्या थेट संपर्कातील व्यक्तींच्याच प्राधान्याने चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे वास्तविक त्यात पॉझिटीव्ह रिपोर्टचे प्रमाण जास्त असणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात संशयित रुग्णांमध्येही पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण 5.72 टक्के आहे, ही समाधानाची बाब आहे.

सर्वाधिक रुग्ण असलेले सहा राज्य (कंसात मृत्यू) 
  1. महाराष्ट्र – 97,648 ( 3590)
  2. तमिळनाडू –  38,716 ( 349)
  3. दिल्ली – 34,687 ( 1,085)
  4. गुजरात – 22,032 (1,385)
  5. उत्तर प्रदेश – 12,088 (345)
  6. राजस्थान – 11,838 ( 265) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.