INDvsWI T20 : भारताचा विंडीजवर सहा गडी राखून दमदार विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – तीन सामन्याच्या मालिकेतल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने विंडीजवर सहा गडी राखून मात करत मोठा विजय मिळवला. कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज भारतीय संघाने पाहुण्या विंडीज संघाविरुद्ध अष्टपैलू खेळ करत एक मोठा विजय मिळवून तीन 20-20 च्या मालिकेतही विजयी सुरुवात केली. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यरची उपयुक्त फलंदाजी आजच्या विजयाचे खास वैशिष्ट्य ठरले.

भारतीय क्रिकेट संघासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठीही येता मोसम भरगच्च सामन्याने भरलेला असणार आहे, दमछाक होणारा हा मोसम क्रिकेटची ओढ वाढवेल की अति तिथे माती करेल, हे येत्या काही दिवसांत कळेलही, पण बीसीसीआय मात्र सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीचा पुरेपूर वापर करणार हे नक्की.

एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत दणदणीत विजय मिळवून आत्मविश्वास जबरदस्त असणाऱ्या भारतीय संघाने आजच्या कोलकाता येथील जगप्रसिद्ध ईडन गार्डनवर होत असलेल्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आज आयपीएल मध्ये आपल्या नावाचा दबदबा अल्पावधीतच निर्माण करणाऱ्या युवा रवी बिष्णोई या युवा लेगस्पिन गोलंदाजासाठी आंतरराष्ट्रीय सामन्याचेही दरवाजे उघडले. त्याचबरोबर भुवनेश्वर आणि हर्षल पटेल या दोन जेष्ठ खेळाडूंनाही पुन्हा एकदा संधी मिळाली. विंडीज संघासाठी आनंदी बाब म्हणजे कायरन पोलार्ड हा तंदुरुस्त होऊन पुन्हा नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला होता.

विंडीजच्या डावाची सुरुवात एकदम सनसनाटी झाली. ब्रेंडन किंगने भूवीच्या पहिल्याच षटकात खणखणीत चौकार मारत चार धावा वसूल केल्यानंतर पुढील तीन चेंडूत भुवीने आपला करिश्मा दाखवला आणि एका स्विंग अप्रतिम चेंडूवर त्याला सूर्यकुमारच्या हातात झेल देऊन बाद करत पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला.

मात्र त्यानंतर निकोलस पुरन आणि खास करून कायले मेयरनी जबरदस्त फलंदाजी करत 38 चेंडुतच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.कायले तुफानी पारी खेळत होता, त्यातच आज पदार्पण करणाऱ्या रवी बिष्णोईचा त्याचा झेल घेतल्यानंतर नकळत सीमारेषेला पाय लागल्याने त्या झेलाचे रुपांतर षटकारात झाले, पण याने निराश न होता यजुवेंद्र चहलने त्याला एका अप्रतिम चेंडूवर पायचीत करत त्याचं छोटी पण स्फोटक खेळी खल्लास करत भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले.

मेयरने सात खणखणीत चौकार मारत 24 चेंडूत 31 धावा चोपल्या.दोन बाद 51 या धावसंख्येत केवळ 21 धावांचीच भर पडलेली असताना रवी बिष्णोईने आपली कमाल दाखवायला सुरुवात केली.प्रथम त्याने चेसला पायचीत करत आपला पहिला टी-20 बळी मिळवला आणि अगदी काही क्षणातच पोवेलला वेंकटेश अय्यरच्या हातून झेल बाद करवून आपला दुसरा बळीही मिळवला.

या त्याच्या करामतीमुळे विंडीजची अवस्था चार बाद 74 अशी झाली होती.त्यानंतर विंडीज कर्णधार पोलार्डने एक वेगळीच खेळी केली,त्याने स्वतःच्या जागी चक्क अकिल उसेंनला पाठवले, पण हा डाव काही यशस्वी ठरला नाही, एक उत्तुंग षटकार मारल्यानंतर लगेचच दीपक चाहरने त्याला स्वतःच्या गोलंदाजी वर झेलबाद करून पाहुण्या संघाची अर्धी फळी तंबुत पाठवली.

या सर्व पडझडीतही निकोलस पूरन मात्र एका बाजूने तग धरून उभा होता,पोलार्ड आल्यानंतर त्याने आक्रमक अंदाजात भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत आपले सहावे अर्धशतक पूर्ण केले,त्याला पोलार्डने उत्तम साथ दिल्याने विंडीज संघाने शेवटच्या पाच षटकात तब्बल साठहुन अधीक धावा चोपल्यानेच पाहुण्या संघाने आपल्या निर्धारित 20 षटकात 157 धावा सात गड्याच्या मोबदल्यात उभ्या केल्या.

पूरनने 43 चेंडूत 5 षटकार आणि चार चौकार मारत 61 धावा केल्या, तर पोलार्ड 24 धावा काढून नाबाद राहिला. भारताकडून रवी बिष्णोईने 17 धावा देत 2,तर हर्षल पटेलने 31 धावा देत दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने जोरदार सुरुवात केली.

खास करून रोहितने त्याने अप्रतिम फटकेबाजी केल्याने भारतीय संघाला चांगली सुरुवातही मिळाली.दुसऱ्या बाजूने त्याला ईशान किशन सुद्धा चांगली साथ देत होता. त्यामुळेच भारतीय डावाचे अर्धशतक केवळ 35 चेंडूतच पूर्ण झाले.रोहीतचा धडाका बघता तो आज आकर्षक आणि मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच वैयक्तिक 40 धावावर तो आणखी एक षटकार मारण्याच्या नादात चेसच्या गोलंदाजीवर स्मिथच्या हातून झेल बाद झाला.

त्याने केवळ 19 चेंडूतच या धावा चोपताना तीन षटकार आणि चार चौकार मारले.तो बाद झाल्यानंतर आपल्या फॉर्म आणि किर्तीसाठी झगडत असलेला माजी कर्णधार विराट कोहली.रोहीत बरसत असताना फुललेला आणि जलदगती गाडी सारखा धडाडणारा धावफलक तो बाद झाल्यानंतर अचानक जनता गाडीसारखा मंदावला.

आयपीएल मध्ये सर्वाधिक बोलीवर मुंबई इंडियन्सने खरेदी केलेला ईशान किशन अचानक धावा काढण्यासाठी धडपडू लागला.त्याच्या बॅटवर चेंडू बसत नव्हते,त्या दडपणाखाली त्याने चेसला एक साहसी फटका मारण्याचा केलेला प्रयत्न त्याच्या आणि पर्यायाने भारतीय संघाच्याही अंगलट आला. त्याने 42 चेंडूत 35 धावा काढल्या. कोहलीचे अपयश आजही त्याची पाठ सोडत नव्हते.

तोही एक उंच फटका मारण्याच्या नादात एलनच्या गोलंदाजीवर पोलार्डच्या हाती झेल देवून तंबूत परतला. नाबाद 64 वरून तीन बाद 95 अशी घसरगुंडी भारतीय संघाची झाली. यावेळी मैदानावर सूर्यकुमार यादव आणि नवीन उपकर्णधार झालेला ऋषभ पंत होते, सूर्यकुमार यादवने चांगली सुरुवात केलेली असतानाच पंत कोर्टलच्या गोलंदाजीवर केवळ 8 धावा काढून बाद झाला.

आक्रमकता हा त्याचा स्थायीभाव झालेला आहे, त्यापायी कधी तो संघाचा तारक होतो, तर कधी तापदायकही. एक हाताने पूल करायचा प्रयत्न फसला आणि त्याचा झेल सोडण्याची चूक स्मिथने केली नाही आणि तो झेल घेताच कोर्टलने आपल्या चिरपरिचित अंदाजात सलाम ठोकून हा बळी घेतल्याचा आनंद साजरा केला खरा पण अशा छोट्या मोठ्या धक्क्याने हदरणारी भारतीय टीम नव्हे.

त्यातच आव्हानही फार मोठे नसल्याने पराभवाची भीती आसपासही फिरकत नव्हती.मात्र तरीही हा खेळ आणि टी-20चा फॉरमॅट असा आहे की यात एखादे खराब/चांगले षटक सामन्याचा निकाल बदलू शकते. त्यातच भारताला शेवटच्या चार षटकात 34 धावा म्हणजेच आठहून अधिकच्या सरासरीने धावा हव्या होत्या. त्यामुळे चमत्काराची अपेक्षा विंडीज संघाने धरली होती.

मात्र सूर्यकुमार यादवच्या मनात ना कसली शंका नव्हती ना कसली भीती, त्याने कोर्टलच्या षटकात एक जबरदस्त षटकार आणि एक चौकार मारून विजय बऱ्यापैकी सोपा करून टाकला. उरलेले काम वेंकटेश अय्यरने करून भारतीय संघाला सहा गडी आणि सात चेंडू राखून मोठा विजय मिळवून दिला. यादवने जवळपास दोनशेच्या सरासरीने नाबाद 34 धावा काढल्या, तसेच या दोघांनी केवळ 28 चेंडूत 48 धावा काढून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

अय्यरने विजयी उत्तुंग षटकार मारला. त्याने 13 चेंडूतच नाबाद 24 धावा काढल्या ज्यात दोन चौकारही सामील होते. अचानकपणे तीन गडी बाद होऊनही भारतीय संघातल्या नव्या शिकेदारांनी न डगमगता विजयाला सहज प्राप्त करून दाखवले.यादव, अय्यर, बिष्णोई, ईशान, या नव्या दमाच्या शिलेदारांनी या विजयात मोठा वाटा उचलला.

मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या 16 तारखेला होणार आहे,त्यातच विजय मिळवून ही सुद्धा मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. आजच्या विजयात जबरदस्त गोलंदाजी करून आपले पदार्पण गाजवणारा रवी बिष्णोईला आपल्या पहिल्याच सामन्यात सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.
धावफलक
विंडीज -7 बाद 157
पुरन 61, पोलार्ड नाबाद24
बिष्णोई 17 धावात 2 गडी बाद
भारत – 4 बाद 162
रोहित 40, यादव नाबाद 34
चेस 14 धावात दोन बळी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.