Nigdi : इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने बांधलेल्या विहिरीचे वाझेघर ग्रामस्थांना लोकार्पण

वेल्हे तालुक्यात इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचे अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज- वेल्हे तालुक्यातील वाझेघर पिंपरी येथे उन्हाळ्यात पाण्याची त्रेधातिरपीट होते. गावातील महिला गावापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या नदीवरील विहिरीवर पाण्यासाठी जातात. भर उन्हात त्यांची पाण्यासाठी वणवण होते. गावक-यांची ही समस्या सोडविण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि पूजा कास्टिंग प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमाने गावात विहीर बांधण्यात आली. यामुळे गावक-यांची पाण्याच्या शोधासाठी होणारी पायपीट कमी होणार आहे. या विहिरीचे नुकतेच गावक-यांना लोकार्पण करण्यात आले.

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या माध्यमातून वाझेघर पिंपरी येथे विहीर बांधण्यात आली. तसेच वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. वेल्हे येथील जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. या तीन अभिनव उपक्रमांमुळे वेल्हे तालुक्यात इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या सामाजिक उपक्रमांचा आलेख उंचावला आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी इनरव्हील क्लबच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्मिता पिंगळे, जिल्हाध्यक्षा रेणू गुप्ता, माजी अध्यक्षा मुक्ती पानसे, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा अॅड. प्रतिभा जोशी दलाल, रो. अर्जुन दलाल, रो. विजय चौधरी, रो. गुरदीप भोगल, ज्ञान प्रबोधिनीचे विवेक गिरिधारी, सुनीता गायकवाड, सुनील जोरकर, अजित देशपांडे, पूजा कास्टिंगचे अनिल कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, सरपंच मारुती शिर्के, अंकुश मोरे आदी उपस्थित होते.

वेल्हे तालुक्यात दरवर्षी सुमारे तीन हजार मिलीमीटर पावसाची नोंद होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही उन्हाळ्यात गावातील महिला दोन-तीन भांडी डोक्यावर घेऊन पाण्यासाठी पायपीट करताना दिसतात. वर्षभर सांभाळलेली जनावरे उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याच्या कमतरतेमुळे येईल त्या किमतीला विकली जातात. तर पाऊस पडल्यानंतर चढ्या दराने पुन्हा जनावरांची खरेदी केली जाते. यामध्ये गावक-यांचा तोटा आहे. ही परिस्थिती केवळ पाणी साठवणीचे नियोजन नसल्यामुळे होत आहे.

पाण्याची साठवण मुबलक प्रमाणात झाल्यास महिलांना पाण्याच्या शोधात पायपीट करावी लागणार नाही, तसेच जनावरे कमी किमतीत विकावी लागणार नाहीत. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडे निधीची कमतरता आहे. ही बाब लक्षात घेत इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने पूजा कास्टिंगच्या सहकार्याने वाझेघर पिंपरी येथे तीस फूट खोल आणि तीस फूट रुंद विहीर बांधण्यात आली. गुरुवारी (दि. 16) या विहिरीचे लोकार्पण करण्यात आले.

वेल्हे तालुक्यातील गावांवर येणारे पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी जास्तीत जास्त निधी जमा करण्याचे आव्हान इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने घेतले आहे. वाझेघर येथील विहीर प्रकल्पाचे नियोजन ज्ञान प्रबोधिनीने केले. ग्रामस्थांनी देखील या प्रकल्पासाठी त्यांचे योगदान दिले. डिसेंबर 2018 मध्ये सुरु झालेले काम मे महिन्यात पूर्ण झाले. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात गावासाठी टँकर मागविण्याची वेळ येत असे. मात्र विहीर तयार झाल्याने हे गाव आता टँकरमुक्त होणार आहे.

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. या टाकीमुळे गावातील पाण्याची समस्या सुटणार आहे. उन्हाळ्यात गावक-यांना विहिरी आणि टँकरचा सामना करावा लागत आहे. पाण्याची टाकी बांधल्यामुळे उत्तम पद्धतीने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठ्याची सोय केल्याबद्दल खोपडेवाडी ग्रामस्थांनी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचे आभार व्यक्त केले. वेल्हे तालुका हा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे पठारी प्रदेश फार अत्यल्प आहे. अनेक विकासकामे आणि नागरिकांच्या सोयीसाठी पठारी प्रदेशाची आवश्यकता असते. ही गरज ओळखून इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने जमीन सपाटीकरणाचा प्रकल्प राबविण्यात आला. जमीन सपाटीकरण केल्याने याची गावक-यांना मोठी मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.