Innovative: परंपरेला छेद देत आशाताईंचे अभिनव गौरीपूजन

पारंपरिक गौरींच्या ऐवजी वेगळ्या स्वरुपातील गौरींचे पूजन करणे हा आशाताईंचा थोडा धाडसीच निर्णय आहे. पण मागील तीन वर्षांपासून त्या हे समाजप्रबोधनाचे काम करत आहेत.

एमपीसी न्यूज (स्मिता जोशी) – आज गौरी निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गणपती येणार येणार म्हणताना त्यांची घरी परत जाण्याची वेळदेखील आली. दिवस कसे भरकन निघून जातात ते कळतच नाही. भरल्या गळ्याने, डोळ्यातल्या आसवांच्या साथीने आज गौरी गणपतींना निरोप दिला जाईल.

लोकमान्यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली त्याला सुमारे सव्वाशे वर्षांचा कालावधी लोटला आहे. जनजागृतीचे निमित्त समोर ठेवून लोकमान्यांनी गणेशोत्सवाची परंपरा सुरु केली. आज त्या परंपरेला अनेक ठिकाणी विकृत छेद दिला जात आहे. त्याचे वेगळेच रुप समोर आले आहे. पण याही परिस्थितीत एक महिला समाजप्रबोधनाचा वारसा डोळसपणे जोपासते आहे.

एवढेच नव्हे तर आपल्या साथीला अनेक आयाबायांना घेऊन त्यांना देखील मार्गदर्शक ठरते आहे. रुढी, परंपरांना छेद देऊन इतरांना डोळस बना असा संदेश देत आहे. आणि नवलाची गोष्ट ही की हे सगळं ती एका खेड्यात राहून करते आहे.

मावळातील कुसगाव येथे राहणा-या आशा उत्तम घोटकुले यांनी यंदा गौरीपूजनाला चक्क करोनाशी लढा देण्या-या महिला डॉक्टर आणि परिचारिकेच्या रुपातील गौरींचीच पूजा केली आहे. पारंपरिक संकेतांना या खेड्यातील अल्पशिक्षित महिलेने छेद दिला असून आता डोळस होण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

आजही शहर असो किंवा गाव आपले सण समारंभ परंपरेने जसे आले आहेत, तसेच करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. मात्र आशाताईंनी त्यात सकारात्मक बदल घडवत आता काळानुरुप बदलाची गरज आपल्या कृतीतून दर्शवली आहे. जणूकाही ‘आधी केले, मग सांगितले’ हेच त्यांनी दाखवून दिले आहे.

पारंपरिक गौरींच्या ऐवजी वेगळ्या स्वरुपातील गौरींचे पूजन करणे हा आशाताईंचा थोडा धाडसीच निर्णय आहे. पण मागील तीन वर्षांपासून त्या हे समाजप्रबोधनाचे काम करत आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ज्येष्ठागौर आणि कनिष्ठागौरीला चक्क डॉक्टर आणि परिचारिका बनवले आहे. आणि त्या दोघीजणी इतरांना कोरोनापासून कसा बचाव करा याची माहिती देत आहेत.

मास्क बांधा, सॅनिटायझर वापरा, फिजिकल डिस्टन्सिंग राखा, खोकताना रुमाल वापरा, अनावश्यक प्रवास टाळा, घरी रहा, सुरक्षित रहा, हात वारंवार स्वच्छ धुवा यासारखे या काळात आवश्यक असलेले अनेक संदेश आशाताईंनी या देखाव्यात मांडले आहेत आणि हा देखावा पाहायला येणा-या महिलांना त्याचे पालन कसे करायचे हे त्या सांगत आहेत.

मागील दोन वर्षे आशाताईंनी गौरींच्या रुपात वेगवेगळे संदेश दिले होते. त्यामुळे यंदा त्यांच्याकडे काय देखावा असणार याची परिसरातील महिलावर्गामध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळे या करोना काळात गौरींच्या दर्शनाला येऊ शकतो का अशी त्यांना विचारणा होत होती. त्यामुळे सुरक्षित अंतराचे सर्व मापदंड सांभाळून त्यांनी महिलांना घरी बोलावले. त्यांना कशी काळजी घ्यायची याची माहिती दिली.

याशिवाय याच देखाव्यात त्यांनी आजी आणि सुनेच्या रुपात इतर मूर्ती ठेवल्या आहेत आणि सुरक्षित प्रसूती कशी करावी, गरोदरपणात काय काळजी घ्यावी हे देखील मांडले आहे. मुळात अंगणवाडी सेविका असल्याने आशाताईंची पंचक्रोशीतील महिलावर्गात चांगली ओळख आहे. त्यात परंपरेला छेद देण्याची धाडसी वृत्ती दाखवल्यामुळे आशाताईंनी या माध्यमातून समाजप्रबोधनाचे आपले काम उत्तम पद्धतीने केले आहे.

यातील उल्लेखनीय बाब म्हणजे आजही शहरातील महिला त्याच त्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथा, परंपरा डोळसपणाने विचार न करता करत आहेत. तिथे एक खेडेगावातील अल्पशिक्षित महिला आपल्या अभिनव कृतीतून लोकजागृतीचे काम करत आहे.

आशाताईंना या कामात त्यांच्या घरातल्यांची समर्थ साथ मिळत आहे. पती उत्तम घोटकुले हे तर मदत करतातच. पण त्याचबरोबर स्पर्धापरीक्षेची तयारी करणारी त्यांची कन्या शुभांगी, भाची समृद्धी पाडाळे आणि मुलगा शुभम आणि पुतण्या यश विजय घोटकुले यांची देखील मोलाची मदत होत आहे.

मनात जिद्द असेल, सकारात्मक विचार असतील आणि डोळस दृष्टी असेल तर एक साधीसुधी स्त्री मनातील अभिनव विचार कृतीत उतरवू शकते आणि जास्त गाजावाजा न करता दिशादर्शक बनू शकते हेच आशाताईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.