Shirur : डॉक्टर, अभिनेता ते नेता – डॉ. अमोल कोल्हे

एका अभियंत्याच्या मुलाचा जीवन प्रवास

एमपीसी न्यूज- डॉक्टर आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने शिरुर मतदार संघाचा आखाडा भलताच तापला आहे. जुन्नर तालुक्यातील मूळचे नारायणगावचे असलेले डॉ. कोल्हे हे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या विषयी.

काही माणसं अशी असतात की ती स्वतःच स्वतःचे नशिब घडवितात. त्यापैकीच डॉ. अमोल कोल्हे हे एक. नारायणगाव मधील कोल्हेमळा येथील ते रहिवासी आहेत. त्यांचे वडील रामसिंग कोल्हे हे पाटबंधारे खात्यामध्ये अभियंता होते. तर आई रंजना या गृहिणी आहेत. डॉ. अमोल यांना एक मोठा भाऊ आहे. ते देखील अभियंता असून भोसरीतील एका खासगी कंपनीत ते नोकरी करतात. नारायणगावमध्येच डॉ. अमोल यांचे आजोळघर आहे. त्यांच्या आजोळघरी सामाजिक कार्याचा वारसा आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून अनेक बड्या-नेत्यांनी त्यांच्या आजोळघरी हजेरी लावलेली आहे. 18 सप्टेंबर 1980 रोजी जन्मलेले डॉ. कोल्हे यांना लहानपणापासूनच ‘सरस्वती’चा वरदहस्त लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे त्यांना बालपणापासूनच प्रचंड आकर्षण आहे.

शाळेत कायम ‘टॉपर’

डॉ. कोल्हे शाळेत पहिल्यापासून ते ‘टॉपर’ राहिले. त्यामुळे शिक्षकांचे लाडके होते. त्यांनी इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण नारायणगावमध्येच घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे इयत्ता चौथी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीतही ते झळकले.

मुंबईतून वैद्यकीय शिक्षण

शालेय जीवनापासूनच त्यांना अभिनय आणि वक्तृत्वाची आवड आहे. त्यामुळे ते कायम चर्चेत असत. शिक्षण घेत असतानाच नाटक, एकांकीकांमधून त्यांनी काम केले. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांची ही बाब खटकायची. अभ्यासावरच लक्ष केंद्रीत कर असे ते डॉ. अमोल यांना सांगायचे. मात्र, अभिनयाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली एकीकडे मालिकांमध्ये काम करायचे आणि दुसरीकडे शिक्षण घ्यायचे असे करत त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले.

शुटींगसाठी बुलेटवरुन मुंबई ते कोल्हापूर

वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केईएम रुग्णालयात नोकरी देखील केली आहे. त्यावेळी नोकरी करुन ते बुलेटवर कोल्हापूरला मालिकांच्या चित्रीकरणासाठी जायचे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘राजा शिव छत्रपती’ या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले. तसेच सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये ही ते संभाजी महाराज साकारत आहे. या मालिकेचे ते निर्माते आहेत. घर गहाण ठेवून त्यांनी संभाजीमहाराजांचे चरित्र पोहचविण्यासाठी ही मालिका हाती घेतली. शिवपुत्र शंभूराजे हे त्यांचे तुफान गाजलेले महानाट्य. ५०० हून अधिक प्रयोग करत त्यांनी शंभूराजेंना महाराष्ट्रभर पोहचविले आहे. अरे आवाज कुणाचा, आघात, ऑन ड्यूटी 24 तास, मराठी टायगर्स , रमा माधव आणि साहेब आदी चित्रपटांमधूनही काम केले आहे. अर्धसत्य, प्रपोजल, भगवा, सत्ताधीश ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. वंडर्स ऑफ महाराष्ट्र, वीकेंड मेजवानी, वीर शिवाजी, सांगा उत्तर सांगा या ‘शो’मध्येही त्यांनी काम केले आहे.

पत्नीही डॉक्टर…

डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी अश्विनी या देखील डॉक्टर असून त्या एका वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत. या दाम्पत्याला आद्या ही मुलगी तर रुद्र हा मुलगा आहे. डॉ. कोल्हे यांचे अख्खे कुटुंब उगीच कुठेतरी सहली काढण्याऐवजी गडकिल्ल्यांवर भ्रमंती करीत असतात हे विशेष. डॉ. कोल्हे हे नियमित व्यायामाला महत्त्व देतात. प्रसिद्ध डॉक्टर व लेखक रवी बापट यांना डॉ. कोल्हे गुरू मानतात.

राजकारणात प्रवेश

डॉ. अमोल कोल्हे यांनी 2014 साली शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते शिवसेनेचे स्टार प्रचारक देखील होते. मनसेकडून त्यांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी तिकीटाची ऑफर होती. मात्र, ती त्यांनी नाकारली. तसे झाले असले तर 2014 मध्येच कोल्हे विरुद्ध आढळराव सामना पहायला मिळाला असता. शिवसेनेचे ते जिल्हा संपर्क प्रमुख देखील होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ते राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.