Chinchwad : लोकमान्यांचा विधायक वारसा जोपासणा-या गणेश मंडळांना प्रोत्साहन देणे आवश्यक – महापौर जाधव 

चिंचवडमध्ये गणेश मंडळांना बक्षीस वितरण

एमपीसी न्यूज – लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाची चळवळ समाज संघटनांसाठी होती. गणेशोत्सव मंडळाकडून तोच विधायक वारसा जोपासला जात आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे, मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धा 2017 चे बक्षीस वितरण आज त्यांच्या खर्चातून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे झालेल्या या बक्षीस वितरण
समारंभाला पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नम्रता लोंढे नगरसदस्य उत्तम केंदळे, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य सागर हिंगणे, दिनेश यादव तसेच परीक्षण समितीचे सदस्य नंदकुमार सातुर्डेकर, श्रावण जाधव व पुरुषोत्तम शेलार आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने 2017 मध्ये गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. तथापि, न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेस बक्षीस वितरण करता आले नाही. महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुढाकार घेऊन स्वनिधीतून विजेत्या गणेशोत्सव मंडळांची बक्षीसे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज पासष्ठ गणेश मंडळांना पाच लाख अठ्ठावीस हजार रुपयाचे बक्षीस वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

महापौर राहुल जाधव म्हणाले, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी समाजात एकत्रित करण्याकरिता हा उत्सव सुरु केला. गणेश मंडळामार्फत कार्यकर्ते घडले जातात. त्यातून मी ही घडलेलो आहे. एखाद्या मंडळाला ही चळवळ सुरु ठेवण्याकरिता किती कष्ट करावे लागतात. याची जाणीव असल्याने महापालिकेच्या निधीतून बक्षीस वितरण करणे न्यायालयीन निर्णयानुसार शक्य नसल्याने आपण स्वखर्चातून या मंडळांना बक्षिसे देऊ शकलो ही माझ्या करिता अभिमानाची गोष्ट आहे.

पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, गेल्या वर्षी भाजपची सत्ता आल्यानंतर गणेश मंडळाची बक्षिसाची रक्कम पहिल्या क्रमांकासाठी एकतीस हजार वरून एक्कावन हजारावर करण्यात आली. न्यायालयीन आदेश असल्यामुळे बक्षीस वितरणास अडचण निर्माण झाली. तथापि गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी महापौर राहुल जाधव यांनी पुढाकार घेऊन मार्ग काढला म्हणून आज बक्षीस वितरण करणे शक्य झाले. गणेशोत्सव मंडळांना कायम सहकार्य करण्याचे धोरण असून सर्व प्रथा परंपरा जोपासण्या साठी सर्व गटनेत्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले

यावेळी विरोधी पक्षनेता दत्तात्रय साने म्हणाले वर्षोनुवर्षे सुरु असलेल्या बक्षीस वितरणाची परंपरा खंडित झाल्याने मी गणेश मंडळांना बक्षिसे मिळण्यासाठी आंदोलन केले. तथापि आज महापौर व सत्तारूढ पक्षनेते यांनी बक्षीस वितरण केल्यामुळे मी यांचे अभिनंदन करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.