Kalewadi Crime News : पतीला शेवटचा फोन करून सहा महिन्यांच्या चिमुकलीसमोर घेतला आईने गळफास

एमपीसी न्यूज – सासरच्या मंडळींची पैशांची मागणी वाढू लागल्याने एका उच्च शिक्षित विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने पतीला फोन केला. ‘शेवटचा फोन करतेय, काही बोलायचं असेल तर बोलून घे’ असे विवाहितेने पतीला सांगितले आणि सहा महिन्यांच्या चिमुकलीसमोर विवाहितेने गळफास घेतला.

ही घटना शुक्रवारी (दि. 12) ज्योतिबानगर, काळेवाडी येथे घडली.

अश्‍विनी दीपक काळेल (वय 25, रा. गजानन कॉलनी, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडिल सत्यवान जगन्नाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 13) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सासू अंजना अण्णा काळेल आणि पती दीपक अण्णा काळेल यांच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती दीपक हा अभियंता आहे. तो भोसरी मधील एका कंपनीत काम करतो. अश्विनी देखील उच्च शिक्षित असून ती गृहिणी होती. त्यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. मागील अनेक दिवसांपासून काळेल कुटुंब काळेवाडी येथे राहत आहे.

आरोपी सासू आणि पती यांनी मयत अश्‍विनीकडे जून 2019 पासून वारंवार पैशाची मागणी केली. पैसे दिल्यानंतरही आणखी पैशाची मागणी करीत सासू आणि पतीने तिचा शाररीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून शुक्रवारी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी अश्विनीने पती दीपकला फोन केला. ‘शेवटचा फोन करतेय, काही बोलायचं असेल तर बोलून घे’ असे तिने पतीला म्हटले. फोनवर बोलत असताना त्यांची सहा महिन्यांची मुलगी घरात खेळत होती. फोनवर बोलून झाल्यानंतर अश्विनीने किचनमधील छताच्या अँगलला गळफास घेतला.

दीपक कामावरून घरी आल्यानंतर त्याने दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. घरातून केवळ बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे दीपकने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता किचनमध्ये अश्विनीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

त्यानंतर अश्विनीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पती दीपक आणि त्याच्या आईच्या विरोधात अश्विनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.