Karnatak News : मशिदीच्या डागडुजीदरम्यान सापडले मंदिराचे अवशेष; नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – कर्नाटक राज्यात एका मशिदीची डागडुजी करताना मंदिर सदृश अवशेष सापडले आहेत. हा प्रकार गुरुवारी (दि. 21) समोर आला आहे. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कर्नाटक राज्यात मंगळूरूपासून काही अंतरावर असलेल्या मिलाली येथील जुमा मशिदीचे मशीद व्यवस्थापन समितीने डागडुजी करण्याचे काम सुरु केले आहे. या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. खोदकाम करत असताना मंदिर सदृश काही अवशेष सापडले आहेत. त्यामुळे मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचा दावा केला जात आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. कागदोपत्री सत्यता पडताळून पाहिल्यानंतर काम सुरु करावं. तोपर्यंत काम थांबवण्यात यावं, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे.

मशिदीचे डागडुजीचे काम करताना जे अवशेष सापडले आहेत, त्याची काळजी घेण्याचे तसेच ते आहे तसेच जतन करण्याचे आदेश दक्षिण कानडा जिल्ह्याच्या आयुक्तांनी दिला आहे. सर्व बाबींची पडताळणी केली जात असून तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन देखील आयुक्तांनी केले आहे.

 

मशिदीच्या जमिनीची मालकी कोणाकडून कशी हस्तांतरित झाली, याची कागदोपत्री पडताळणी प्रशासनाकडून केली जात आहे. जमिनीची नोंद ठेवणारा विभाग आणि वक्फ बोर्ड या दोघांकडून माहिती घेऊन याबाबत निर्णय दिला जाईल, असे दक्षिण कानडाचे उपायुक्त राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.