Pune News: कंत्राटदारांच्या अचानक संपामुळे PMPML च्या सुमारे 650 बस बंद, प्रवाशांचे हाल

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या खासगी ठेकेदारांनी आज (शुक्रवार) सकाळपासून अचानक बस वाहतूक  थांबवली. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे 650 बसची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक खोळंबली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई  करण्याची नोटीस पीएमपीने सर्व ठेकेदारांना पाठवली आहे.

थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचे वाहतूकदारांचे म्हणणं आहे. तर, हा दबावतंत्राचा भाग असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले आहे.  पीएमपीमध्ये सुमारे सात खाजगी ठेकेदारांच्या 956 बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे 650 ते 700 बस दररोज मार्गांवर धावतात. या बसची वाहतूक शुक्रवार सकाळपासून बंद झाली. त्यामुळे पीएमपी प्रशासनाची तारांबळ उडाली.

ठेकेदारांना गुरुवारीच 54 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ते पैसे आज त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. संप करण्याचे वेगळेच कारण दिसून येत आहे.पीएमपीच्या 1200 पैकी जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच संपर्क करणाऱ्या ठेकेदारांना अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये नोटीसही बजावण्यात आली आहे, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पीएमपी ठेकेदारांची देणी देण्याकामी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकतेच 86 कोटी संचलन तूट  पीएमपीकडे वर्ग केलेले आहेत. तरी देखील पीएमपीएमएलच्या खासगी भाडेतत्त्वावरील सर्व ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.  नोकरदार, विद्यार्थी, कामगार,जेष्ठ नागरिक यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पीएमपीच्या कंत्राटी ठेकेदारांनी अचानक पुकारलेल्या बंदमुळे, चालक-वाहक सेवक पहाटे 4 वाजल्यापासून डेपोत बसून होते. काम न मिळाल्याने त्यांचे‌ मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,  असे राष्ट्रवादी महाराष्ट्र कामगार युनियनचे संतोष शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.