Pune Bye-Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज : कसबा पोटनिवडणुकीसाठी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Pune Bye-Election) यांना उमेदवारी देण्यात आल्याने ब्राम्हण समाज नाराज आहे. त्यामुळे आज हिंदू महासभेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं असून त्यावेळी हिंदू महासंघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी हातात भगवे झेंडे घेत आणि मुक्ता टिळकांचा फोटो घेत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घेऊन अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्यासोबतच पुणेश्वराला मुक्त करणे तसेच स्वच्छ, सुंदर कसबा हे आपले ध्येय असल्याचे दवे यांनी सांगितलं आहे. काल आनंद दवेंनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, भाजपला काही जातींची केवळ मते हवी असतात. त्या जाती नकोच असतात.

Pimpri News : औद्योगिक क्षेत्रासाठी कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटचे आयुक्तांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन

टिळकांना उमेदवारी न दिल्याने आज खुल्या प्रवर्गाचा आवाज दाबण्याचा पुन्हा प्रयत्न झाला आहे. सर्वच जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याच भावनेतून आम्ही हिंदू महासंघ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे कसबा मतदारसंघ निवडणूक लढवणार आहोत, असं ते म्हणाले होते.

कसब्याची निवडणूक चुरशीची आहे. ज्या भाजपची लोकं टिंगल उडवत होते. त्याचवेळी भाजपला वाढण्यासाठी एकमेव ब्राह्मण सामाजाने साथ दिली. (Pune Bye-Election) त्या समाजाला वाळीत टाकण्याचं काम भाजप करताना दिसत आहे. कोथरुड पाठोपाठ कसब्यातही तेच चित्र बघायला मिळालं. जगताप कुटुंबीयांना चिंचवडमध्ये न्याय देण्यात आला, तोच न्याय टिळकांच्या घरात का दिला नाही, असा प्रश्न आनंद दवे यांनी केला होता.

हिंदू समाजातील सर्व जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. पुणे जिल्ह्यात 21 आमदार असताना प्रत्येक समाजाचे प्रतिनिधित्व असताना ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व का डावलले गेले, असा प्रश्न आनंद दवे यांनी भाजपला केला होता. ब्राह्मण समाजाची मागणी हिंदू महासभेपर्यंत आल्यानंतर मी स्वत: रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला ही धोक्याची सूचना आहे. हिंदू महासंघाचा उमेदवार इथं निवडून येईल, अशी माझी खात्री असल्याचे दवे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.