Kedar Shinde: केदार शिंदे लवकरच घेऊन येतोय नवीन काहीतरी…

Kedar Shinde is coming soon with something new ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या 'अनुदिनी' या पुस्तकावर आधारलेली त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'.

एमपीसी न्यूज – मराठी चित्रपटाला वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारा गुणी दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. तरुण, फ्रेश, वेगळ्या आशय विषयाचे चित्रपट देण्यात त्याचा हातखंडा. त्याच्या कामावर नजर टाकली की त्याच्या विषयांमधील वैविध्य लगेच कळते. सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, तू तू.. मी..मी.. गेला उडत, गोपाळा रे गोपाळा अशी नाटकं. हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, साहेब बिबी आणि मी या मालिका. ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे अशा सिनेमांचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या ‘अनुदिनी’ या पुस्तकावर आधारलेली त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’. ही मालिका लॉकडाउनच्या काळात पुन्हा एकदा सुरु करण्यात आली होती. मात्र या मालिकेचा पुढचा पार्ट केदार शिंदे घेऊन येणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे त्यांनी फेसबुकवर शेअर केलेला एक छोटासा व्हिडीओ.

श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतील पात्रांचा हा कार्टून प्रोमो आहे. त्याला तेच ते चिरपरिचित टायटल म्युझिकही आहे. ज्यामुळे श्रीयुत गंगाधर टिपरेंच्या आठवणी ताज्या होतात. यासोबतच केदार शिंदे म्हणतात, “हे प्रेम… लोकहो लवकरच नवं काहीतरी घेऊन येतोय. यासारखं काहीच होऊ शकत नाही. पण, अभिमानाने सांगू शकाल की मराठीत चांगलं पाहण्याची इच्छा पूर्ण झाली.”

श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यामधले शेखर, शामला, आबा, शलाका आणि शिरीष अर्थात शिऱ्या हे सगळ्यांच्या लक्षात आहेत. ही मालिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. आता याच मालिकेचा पुढचा पार्ट केदार शिंदे आणतील का? तर याचं उत्तर सध्या तरी मिळायचं आहे.

पण त्यांनी म्हटलंय की यासारखं काहीच होऊ शकत नाही.. त्यामुळे कदाचित टिपरेचा पुढचा भाग केदार शिंदे आणतील असं वाटत आहे. समजा तसं झालं नाहीच तरीही केदार शिंदे कोणती नवी मालिका घेऊन भेटीला येणार याची उत्सुकता रसिकांमध्ये आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.