Khed : भोसे येथे मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाचे उदघाटन

एमपीसी न्यूज – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित भोसे ( ता.खेड ) येथील मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाचे उदघाटन व स्मरणिका प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

भोसे व परिसरातील ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील गोरगरीब विद्यार्थी व विद्यार्थिनींचे महाविद्यालयीन शिक्षण व त्यापुढील उच्च शिक्षणाचे स्वप्नपूर्तीसाठी भोसे येथे ग्रामस्थांच्या आग्रहास्तव कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा संकल्प प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने पूर्णत्वास आणला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांच्या प्रयत्नातून मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाची उभारणी खेड येथील भोसे मध्ये करण्यात आली. या महाविद्यालयाच्या उदघाटन प्रसंगी राज्य उत्पादन व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार दिलीप मोहिते उपस्थित होते.

उदघाटनप्रसंगी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी, ग्रामीण भागात संस्थेने शैक्षणिक शाखा सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील सर्व उपक्रमात सहकार्य करण्याची हमी दिली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. एकबोटे यांनी वळसे पाटील यांचे धन्यवाद मानले तर भोसे व चाकण परिसरात पुढील काळात व्यावसायिक अभ्यासक्रम, आय.टी.आय. तसेच फार्मसी कॉलेज आदी शाखा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.

भोसे येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमास पुणे जि.प. अध्यक्षा निर्मला पानसरे, सदस्य बाबाजी काळे, पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती अरगडे,संस्थेचे कार्यवाह शामकांत देशमुख,उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे सहकार्यवाह सुरेश तोडकर तसेच सरपंच शितल चव्हाण, गिरीजा मिटकर, प्राचार्या निता वर्मा व भोसे गावचे ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरीक, विद्यार्थी, वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.