Pune: पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे 6 मार्चला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन 

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे (Pune)उदघाटन दि. 6 मार्चला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील, अशी माहिती महामेट्रोतर्फे देण्यात आली. 
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्याने त्याचे (Pune)उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारीला करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मोदींचा दौरा लांबणीवर पडल्याने ते होऊ शकले नाही. यामुळे या मार्गाचे उदघाटन करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी दि. 19ते 21 जानेवारी या कालावधीत केली होती. या तपासणीदरम्यान त्यांनी या मार्गातील काही त्रुटी उपस्थित केल्या होत्या.
त्या दूर करून महामेट्रोने त्याचा अहवाल आयुक्तांना पाठविल्यानंतर या मार्गाला काही अटींसह परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सेवा सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
मेट्रोची विस्तारित सेवा गेल्या वर्षी दि. १ ऑगस्टला सुरू झाली. वनाज ते रुबी हॉल हा 9.7 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी या मार्गावर वनाज ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू होती. नंतर गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला.
याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मार्ग होता. नंतर हा मार्ग फुगेवाडीपासून जिल्हा न्यायालयापर्यंत विस्तारला. आता वनाज ते रुबी हॉल मार्ग रामवाडीपर्यंत विस्तारण्यात आला असून, या मार्गावर अद्याप सेवा सुरू झालेली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.