Kivale : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा चौथा पदवीप्रदान सोहळा संपन्न

दीक्षांत समारंभात 588 विद्यार्थ्यांना मिळाली पदवी

एमपीसी न्यूज – किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स (Kivale) अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा चौथा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न झाला. या समारंभात एकूण 588 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात महाविद्यालयातून शिक्षण घेऊन आपल्या नेतृत्व, कौशल्य गुणांनी स्वतःचा व्यवसाय आणि उत्तम करिअरची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमासाठी भारत फोर्ज लिमिटेडचे अध्य्क्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब नीलकंठ कल्याणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी नीती आयोगाचे माजी सचिव राजेश्वर राव हे सन्माननीय अतिथी म्हणून तर सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र- कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिउरकर आदी उपस्थित होते.

Nigdi :  भुयारी मार्गास ‘राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्याची मागणी 

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र- कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार विद्यापीठातील अध्यापनशास्त्राची माहिती देताना म्हणाल्या की, “70 टक्के प्रात्यक्षिक आणि 30 टक्के कौशल्य शिक्षणावर आमचा भर आहे. केवळ पारंपरिक शिक्षण पद्धतीचा अवलंब न करता रोजगाराभिमुक आणि उद्योगांना लागणाऱ्या कौशल्यांवर आमचा अभ्यासक्रम बनविण्यात आला असल्याचे सांगत त्यांनी यावेळेस उपस्थितांना विद्यापीठात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

सिंबायोसिस  स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत नाविन्यपूर्ण गोष्टी जोपासणे आवश्यक आहे. नवनवीन उत्पादने, संपत्ती निर्मिती तसेच आपल्या राष्ट्राच्या प्रगतीकडे नेणाऱ्या नवकल्पनांवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे. हे तीन गुण विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यास नक्कीच महत्वपूर्ण ठरतील आणि खऱ्या देशभक्तीची भावना जागृत करतील.”

भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब नीलकंठ कल्याणी म्हणाले, “विकसनशील जगामध्ये सतत नव्याने विकसित होत असलेले तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), जागतिक पातळीवरील डिजिटायझेशनचे रूपांतरण हे सर्व बदल लक्षात घेत भविष्यातील नवीन संधीसाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.” याप्रसंगी त्यांनी तरुणांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी कौशल्य आधारित शिक्षणपद्धतीचा अवलंब करणाऱ्या एसएसपीयु सारख्या सुमारे पाच हजार कौशल्य विद्यापीठांची आवश्यकता व्यक्त केली.

बाबासाहेब नीलकंठ कल्याणी यांनी विद्यापीठात औद्योगिक भागीदारांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग डिप्लोमा आणि इंडस्ट्री 4.0 मध्ये पदविकाचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. महिला सक्षमीकरणासाठी एसएसपीयुतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

नीती आयोगाचे माजी सचिव राजेश्वर राव विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “अपयशाची भीती न बाळगता कठोर निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम व्हावे. या वेगवान जगात स्पर्धात्मक राहण्यासाठी स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करावे. तसेच नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि घडामोडींसह अद्ययावत राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी एसएसपीयु दरवर्षी आत्मनिर्भर पुरस्कार प्रदान करते. विद्यापीठातील अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या आणि स्वतःचा नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यावर्षीचा आत्मनिर्भर पुरस्कार बी टेक – मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आयुष अग्रवाल आणि बीबीए रिटेल मॅनेजमेंट अँड ई कॉमर्सची विद्यार्थिनी प्रीती अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला.

तसेच ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात कौशल्ये आत्मसात केली आहेत आणि त्यांच्या करिअरची यशस्वी सुरुवात केली आहे अशापैकी एका सरस विद्यार्थ्यास विद्यापीठ ‘कुशल पुरस्कार’ प्रदान करते. यावर्षी दीक्षांत समारंभात निखतपरुईन गुलाब शेख हिला ‘कुशल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावर्षीचे कुलपती सुवर्ण पदक बीबीए (लॉजिस्टिक)चा विद्यार्थी सोहम भावेश चौहान आणि एमएससी (न्यूट्रीशनल सायन्सेस अँड डायटेटिक्स)ची विद्यार्थीनी भक्ती. एन. मुजुमदार हिला प्रदान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.