Talegaon : लायन्स क्लब ऑफ तळेगावची अनोखी दिवाळी

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ तळेगावने यावर्षीची दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी केली. मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागात आदिवासी लोकांची वस्ती विविध ठिकाणी आहे. या भागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे साहित्य वाटून दिवाळी साजरी करण्यात आली आहे.

लायन अॅड. मनोहर दाभाडे यांच्या पुढाकाराने व आर्थिक सहकार्याने तसेच लायन डॉ. दीपक शहा, लायन शेखर चौधरी व अन्य साथीदारांच्या मदतीने मावळ तालुक्यातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. लायन अध्यक्षा राजेश्री शहा व इतर लायन सदस्यांसमवेत वडेश्वर, वहानगाव, कुसवली, नागाथली, माउ, शिंदेवाडी, सटवाईवाडी, लष्करवाडी, दवणेवाडी इत्यादी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना कपडे, जेवणाचे डबे, कचरा पेटी, वह्या, पेन, पेन्सिल, पोस्टर, पाण्याचे जग, ग्लास, वजन काटा, प्रथमोपचार पेटी, चिक्की व बिस्किटे याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा विचार करून फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प केला. तशी शपथ सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. फटाकेमुक्त दिवाळीची पत्रके वाटण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य तंदुरुस्त राहावे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यास सूर्यनमस्काराचे महत्व पटवून देऊन एक पुस्तक देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवटी निर्माण व्हावी म्हणून विविध गोष्टींची पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावे म्हणून त्यांना विविध मैदानी खेळाचे साहित्य देण्यात आले. आणि एका शाळेसाठी अत्यंत अत्यावश्यक असल्याने 500 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देण्यात आली. या उपक्रमासाठी शाळा प्रमुख ठोंगिरे, शिक्षक व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.