Lockdown Update: कंपन्या व कामगारांनी ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी

Lockdown Update: Companies and workers should take care of these things

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात शहर व जिल्ह्यातील उद्योग सुरू राहणार असून त्यासाठी करण्यात आलेल्या कडक नियमावलीत आज थोडी शिथिलता आणण्यात आली आहे. कंपन्या आणि कामगारांनी त्याचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लॉकडाऊन कालावधीत उद्योग, आस्थापना, कंपन्यांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पास पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात प्रवासासाठी लागू रहातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, दूरसंचार कंपन्या आणि कृषी कंपन्या कडक टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) काळात देखील सुरू राहणार आहेत. या कंपन्यांमधील अधिकारी, कामगार यांना रोजच्या प्रवासासाठी पोलीस पासची गरज नसेल, असे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कळविले आहे.

कंपन्यांच्या एचआर (मनुष्यबळ) विभागप्रमुखाने कंपनीच्या लेटरहेडवर वाहन परवाना द्यावा. या परवान्यांची माहिती एचआरने संबंधित पोलीस आयुक्त व पोलीस स्टेशन प्रभारी यांना द्यावी. कामगार-अधिकाऱ्यांनी कंपनीने दिलेला वाहन परवाना सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

मेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व्यावसायिक, आणि रुग्णवाहिकांना शहरांतर्गत वाहतुकीसाठी वेगळ्या पासची अथवा परवानगीची गरज नाही. तसेच पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते संध्याकाळी  6 या वेळेत शासकीय, अत्यावश्यक सेवेतील तसेच कंपन्यांनी परवानगी दिलेल्या  वाहनांसाठी सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु झालेल्या एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. परंतु जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले,चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, जेजुरी, कुरकुंभ सह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्र सुरु राहतील,

ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या सर्व ग्रामपंचायती, तालुक्याच्या ठिकाणची शेती संबंधित खते, औषधे व अवजारांच्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.

ग्रामीण भागात नागरिकांनी कामाशिवाय बाहेर फिरु नये, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.