Lonavala : पोलीस चौकीची इमारत शासनाच्या नावावर करण्यासाठी 26 जानेवारीला घंटानाद आंदोलन

एमपीसी न्यूज- नागरिकांच्या सुविधेकरिता जनसहभागातून बांधण्यात आलेली नारायणीधाम पोलीस चौकीची इमारत शासनाच्या अथवा लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या नावे करण्यात यावी या मागणीकरिता अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार न्यासचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांनी येत्या 26 जानेवारी रोजी शहर पोलीस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पोरवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

2016 साली लोणावळा शहरात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत नारायणीधाम मार्गावर तसेच रायवुड व भांगरवाडी या तीन ठिकाणी लोकसहभागातून पोलीस चौक्या उभारण्यात आल्या होत्या. यापैकी नारायणीधाम मार्गावरील चौकी ही भोगवटादार म्हणून सुमन विष्णु पाटील यांचे नावे असून नगरपरिषदेचा कर व लाईटबिल देखील त्यांच्या नावे असल्याने पोलीस चौकी खासगी व्यक्तीच्या नावे कशी ? असा प्रश्न उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांनी सदरची चौकी ही शासनाच्या अथवा पोलीस ठाण्याच्या नावे करावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलीस प्राधिकरण समिती, पुणे ग्रामीण अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

मात्र प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याने येत्या 26 जानेवारी रोजी शासनाला व प्रशासनाला जागे करण्याकरिता पोलीस ठाणे व नगरपरिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा पवित्रा पोेरवाल यांनी घेतला आहे.

पोरवाल म्हणाले, ” नारायणीधाम पोलीस चौकीची जागा हे पोस्ट आॅफिसचे आरक्षण असून या जागेवर अनधिकृतपणे पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. तसेच चौकीच्या काही भागात तत्कालिन पोलीस निरीक्षक आय.एस.पाटील यांनी त्यांच्या नातेवाईक असलेल्या सुमन पाटील यांना हाॅटेलकरिता जागा दिली होती. आजही त्याठिकाणी पाटील यांच्या नावाची पाटी आहे. तसेच कर पावती व लाईट बिल देखील त्यांच्या नावावर भोगवटादार म्हणून येत असल्याचे पोरवाल यांनी सांगितले.

“याबाबत पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी देखील प्राधिकरणाला अहवाल सादर करताना पोलीस निरीक्षक आय.एस. पाटील यांनी पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे म्हटले आहे”

याबाबत बोलताना आय.एस.पाटील यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 2016 साली नागरिकांच्या व शहराच्या सुरक्षेकरिता सदर पोलीस चौकी नारायणीधामच्या सहकार्यातून बांधली होती. त्याठिकाणी कसलेही हाॅटेल नसून पोलीस स्टेशनचे कामकाज चालते. आज या चौकीवर कोणी हरकत घेत असेल तर संबंधित यंत्रणांकडून या जागेची उपयोगिता पडताळून घेत योग्य ती कारवाई करावी. पोरवाल यांनी विनाकारण माझी बदनामी केली असून मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.