Lonavala : ‘थर्टी फस्ट’च्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या ‘लायन्स पाँईट’ पर्यटकांसाठी बंद!

एमपीसी न्यूज – ‘लायन्स पाॅईट’ परिसरात सुरु असलेली हुल्लडबाजी, गर्दीमुळे होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर वन विभागाने 30 आणि 31 डिसेंबर रोजी लायन्स पाँईट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहेत. तसेच याबाबतच्या व्यवसायिकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मागील दोन दिवस याठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीसांनी बेकायदा हुक्काविक्री करणार्‍या पाच जणांना गुन्हे दाखल करत मुद्देमाल हस्तगत केला आहे. बेकायदा हुक्का विक्रीमुळे लायन्स पाँईट बदनाम झाला आहे. थर्टी फस्ट आणि नववर्षाच्या स्वागता दरम्यान या भागात मोठ्या संख्येने येणार्‍या पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता वरिष्ठांच्या आदेशान्वे हा निर्णय घेतला असल्याची माहिती मावळ वन विभागाने दिली आहे.

थर्टी फस्ट पार्ट्यांकरिता उनाड पर्यटक जंगलभागाचा असरा घेतात. यामुळे वन्यजीवांचे व वन्य संपत्तीचे नुकसना होतो. तसेच वन विभागाच्या जागेत कोणताही चुकीचा प्रकार घडू नये, याकरिता वन विभागाचे कर्मचारी पुढील दोन-तीन दिवस रात्रंदिवस पहारा देणार आहेत. वन विभागाच्या जागेत कोणी अतिक्रमण वा पार्ट्या केल्यास त्यांच्यावर वन विभागाच्या कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप देणे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता हजारो पर्यटक लोणावळ्यात येतात. पार्ट्यांकरिता शांत जागा म्हणून पर्यटक शहरांपासून दूर वन विभागाच्या जंगल भागात जाण्याला पसंती देतात. दारु पार्ट्या, हुक्का व अंमली पदार्थाच्या रेव्ह पार्ट्या यांचा यामध्ये समावेश असतो. अनेक वेळा उपद्रवी पर्यटकांकडून जंगले पेटविण्याचे, जाळा करिता झाडे तोडण्याचे प्रकार घडतात.

वन्यजीव व वन संपत्तीला यामुळे धोका निर्माण होत असल्याने वन विभागाने लायन्स पाँईट, टायगर पाँईट, राजमाची किल्ला, विसापूर किल्ला परिसर, पवनानगरचा परिसर, शिरोता व ताम्हिणी घाट परिसर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वन विभागाच्या या निर्णयामुळे हुल्लडबाजी करणाऱ्यांना आळा बसणार असला तरी पर्यटनाकरिता येणार्‍या इतर पर्यटकांच्या आनंदावर मात्र विरजण पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.