Karla News: एकविरा मंदिरासमोर भाजपचा घंटानाद; मंदिर खुले करण्याची मागणी

कोरोना (कोविड) महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पाच महिन्यांपुर्वी बंद केलेली मंदिरे अद्यापपावेतो बंद स्थितीत आहेत.

एमपीसीन्यूज : राज्यातील मंदिरांचे दरवाजे उघडण्याच्या मागणीसाठी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत असलेले वेहेरगाव येथील एकविरा मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजप कार्यकर्ते आणि महिला मोठ्यासंख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

कोरोनामुळे गेली पाच महिने महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद आहेत. वेहेरगाव येथील एकवीरा देवी मंदिराजवळ असलेली 200 पेक्षा जास्त असणारी दुकाने बंद आहे.  तसेच फेरीवाले, हार, नारळ देवीचा प्रसाद विकणारे, रिक्षावाले, हमाली करणारे तसेच गावातील तरुण बेरोजगार झाले आहेत.

अनेक कुटुंबांना कुटुंब चालविणे जिकिरीचे झाले असून दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. लवकरात लवकर शासनाने मंदिर चालू करावी, अशी तीव्र भावना तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, महिला आघाडी अध्यक्ष सायली बोत्रे यांनी व्यक्त केली.

कोरोना (कोविड) महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पाच महिन्यांपुर्वी बंद केलेली मंदिरे अद्यापपावेतो बंद स्थितीत आहेत.

राज्यात लॉकडाऊन शिथील करण्याची प्रक्रिया 1 जून 2020 पासून सुरू झाली आहे. यानुसारच राज्यातील दारुची दुकाने खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. असे असताना सर्व मंदिरे  बंद ठेवून सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे?, असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र हे भक्ती सांप्रदायाची उज्ज्वल परंपरा असलेले सुसंस्कृत राज्य आहे. तसेच सर्व प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी त्या भागातील अनेक कुटुंबांची उपजीविका व संबंधित प्रदेशाची अर्थव्यवस्था तेथे येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे.

परंतु मागील पाच महिन्यांपासून मंदिरे बंद असल्यामुळे तेथील सर्वकाही विस्कळीत झाले आहे.अशा वेळी दीर्घकाळ मंदिरे बंद ठेवणे महाराष्ट्र राज्याच्या भक्ती परंपरेला भूषणावह नाही. म्हणून राज्यातील सर्व मंदिरे कायमस्वरूपी खुली करावीत, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद बोत्रे, वाकसई गणअध्यक्ष सचिन येवले, कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी, नाणे मावळ महिला आघाडी अध्यक्षा सीमा आहेर, मधुकर पडवळ, एकनाथ गायकवाड, वसंतराव माने, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, सदाशिव बांगर, अमोल भेगडे, रामचंद्र पडवळ, मंगेश देशमुख, मोरेश्वर पडवळ, निवृत्ती बोत्रे, पांडुरंग बोत्रे, नवनाथ कडू , पांडुरंग माने, विशाल रसाळ, पांडुरंग पवार, लतिफ शेख आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

सोशल डिस्टंन्सिंगच्या सर्व सरकारी नियमांचे पालन करुन घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महीलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.