Lonavala News : ओबीसी आरक्षणासाठी भाजपाकडून लोणावळ्यात चक्काजाम

एमपीसीन्यूज : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जाण्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत लोणावळ्यात भाजपाच्या वतीने माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत भुमिका घेण्यासाठी ओबीसी व्हीजीएनटी न्याय हक्क समितीच्या वतीने आजपासून लोणावळ्यात दोन दिवसीय चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ व काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यांना विरोध दर्शविण्यासाठी लोणावळ्यात हे आंदोलन करण्यात आले. याकरिता लोणावळ्यातील कुमार रिसार्ट समोर पुणे -मुंबई राष्ट्रीय महामार्ग आडविण्यात आला होता.

यामध्ये माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ओबीसी पुणे जिल्हाध्यक्ष सागर भुमकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, महिलाध्यक्षा योगिता कोकरे, नगरसेवक श्रीधर पुजारी, देविदास कडू, रचना सिनकर, ब्रिंदा गणात्रा, मंदा सोनवणे, बाळासाहेब जाधव, हर्षल होगले, शुभम मानकामे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महाविकास आघाडीमधील ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वड्डेटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. सुमारे एक तासाहून अधिक काळ राष्ट्रीय महामार्ग रोखला गेल्याने दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. लोणावळा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने आंदोलन स्थळावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रास्ता रोकोनंतर टिळेकर व कार्यकर्ते चिंतन बैठकीच्या ठिकाणी निषेध नोंदविण्यासाठी जात असताना, ए वन चौकात आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी आडवत पुन्हा मागे आणले. यावेळी पुन्हा कुमार चौकात ठिय्या मांडून बसलेले टिळेकर, गणेश भेगडे यांच्यासह 25 ते 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कलम 68 व 69 प्रमाणे कारवाई करत सोडून देण्यात आले.

राज्यातील ओबीसी नेत्यांचे सरकारमध्ये कोणी ऐकत नसल्याने ओबीसी नेत्यांना चिंतन शिबिर घेण्याची वेळ आली असल्याची टिका माजी आमदार योगेश टिळेकर यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.