Lonavala News: लोणावळा-खंडाळ्यात सुरक्षाविषयक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा – आमदार शेळके

एमपीसी न्यूज – लोणावळा-खंडाळा भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सुरक्षाविषयक उपाययोजनांचे कडक पालन होईल, याची खबरदारी प्रशासन व पोलीस खात्याबरोबरच सर्व नागरिकांनीही घ्यावी, अशा सूचना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज (रविवार) दिल्या.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी खंडाळा चेक पोस्ट येथे समक्ष जाऊन पाहणी केली.  पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत यावेळी माहिती घेतली. तसेच लोणावळा-खंडाळा परिसरातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी अजून काय उपाययोजना करता येतील याविषयी पोलिस प्रशासनासोबत चर्चा केली.

पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर मुंबईसह इतर भागातून लोणावळा, खंडाळा परिसरात नागरिकांच्या येण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच गाडीत मर्यादेपेक्षा जास्त नागरिक बसलेले आढळून येत आहेत. या वेळी कोणत्याही प्रकारची सुरक्षा बाळगत नसल्याचे चित्र आहे. अनेक जण मास्क न लावता विनाकारण फिरत असल्याचे आढळून येत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केली.

‘प्रशासनाच्या वतीने विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत.कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देश पाळावे. घरात रहावे, सुरक्षित रहावे. प्रशासनाने लावलेले निर्बंध पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. प्रत्येकाने आपापल्या परीने या कोरोना संकटाच्या सद्यस्थितीवर मात करण्यासाठी सहकार्य करावे,’ अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.