Lonavala: कोरोनाच्या संकटात माणुसकीचं दर्शन!

एमपीसी न्यूज – कोरोना या महामारीचे संकट देशातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर असताना या महामारीला न घाबरता नागरिक स्वतःच्या जीवासोबत इतरांच्या जीवाची काळजी करत माणुसकीचं दर्शन घडवत असल्याचे विविध प्रसंग रोज पहायला व अनुभवायला मिळत आहेत.

कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्याकरिता देशभरात 21 दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे. जमावबंदी व संचारबंदी लागू करत नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करत स्वतः मात्र दिवसरात्र रस्त्यावर हातात काठी घेऊन ड्युटी बजावणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना लोणावळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तोंडाला बांधायचे मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, चहा, बिस्लरी, जेवणाची पाकिटे, बिस्किटे वाटप केले आहेत. पोलीस कर्मचार्‍यांप्रमाणे शहरातील व परिसरातील गोरगरीब नागरिक, कातकरी व आदिवासी समाज यांना देखील मदत करण्यासाठी विविध संघटना पुढे सरसावल्या आहेत.

बंदच्या काळात शहरातील सर्व दुकाने, हाॅटेल व टपर्‍या बंद असल्याने वाटसरू नागरिक व शहरातील हातावर पोट असणारे गोरगरीब यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता गवळीवाडा येथील श्रीराम मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने 22 मार्चपासून बंद असेपर्यंत मसालेभात वाटप सुरू आहे.

भारतीय जनता पार्टी, लोणावळा मंडल, आरएसएस व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी गोरगरीबांची गैरसोय टाळण्याकरिता त्यांना एक महिन्याचा किराणा व भाजीपाला देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. थाळी जंक्शन यांनी जेवण दिले. पोलीस प्रशासन देखील त्यांना आलेल्या जेवणाच्या डब्यापैकी काही डबे  गोरगरीब भिकारी यांना देत आहे.

काही ग्रामपंचायतींनी पोलीस स्थानकाच्या परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. विविध सामाजिक संघटना व व्यावसायिक यांनी पुढाकार घेत कोरोनाच्या भीषणतेमध्ये माणुसकीचे दर्शन घडविले आहेत. याउलट ज्यांना जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिली, असा काही संधीसाधू व्यावसायिकांकडून सर्वसामान्यांची लूट सुरु असल्याचे चित्र संताप वाढविणारे आहे. लोणावळा शहरात किराणा सामान, भाजीपाला, मटण यांची जादा दराने विक्री सुरु असल्याने सर्वसामान्य संताप व्यक्त करत आहेत.

पेट्रोल पंपावर रांगा; कर्मचार्‍यांशी हुज्जत

जीवनावश्यक सेवा व अत्यावश्यक सेवेशी संबंधित वाहने यांनाच पेट्रोल देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने सर्वसामान्य नागरिकांकरिता पेट्रोल व डिझेल बंद करण्यात आले आहे. जमावबंदी व संचारबंदीचे पालन करत नागरिकांनी घरात थांबावे, याकरिता हा निर्णय घेण्यात आलेला असताना काही नागरिक विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करत कर्मचार्‍यांशी हुज्जत घालत आहेत. अत्यावश्यक सेवांवर असलेल्या वाहनांच्या याद्या पेट्रोलपंपावर देण्यात आल्या आहेत. जर कोणास खरंच काही महत्त्वाचे काम असल्यास त्यांनी मावळचे प्रांत अधिकारी यांच्याकडून तसे पत्र अथवा ईमेल मेसेज आणावे असा सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.