Lonavala : राजकारण न आणता खेळाडू व खेळाच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज- बाळा भेगडे

राष्ट्रीय मल्ल प्रतीक देशमुख युवा क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज- सध्या सर्वच क्षेत्रातील गुणवंतांना विविध क्षेत्रात चांगले दिवस आले आहे. खेळ कोणताही असो, खेळात राजकारण न आणता प्रत्येक खेळाडू व खेळाच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्यांना सरकार कडून चांगली नोकरी व समाधानकारक मानधन मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच खेळांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी गाव तेथे व्यायामशाळा, तालुका तेथे अद्यावत क्रीडासंकुल हे सरकारचे मुख्य धोरण आहे. युवकांनी कोणत्याही क्षेत्रात मिळविलेल्या अल्पशा यशाने हुरळून न जाता यापेक्षा अधिक मोठे यश मिळवून गाव, राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करा. असे मत कामगार, पर्यावरण मदत व भूकंप पुर्नवसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी व्यक्त केले.

मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने सडवली, मावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा क्रीडारत्न’ पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मावळ तालुका कुस्तीगीर संघाने बाळा भेगडे यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

राज्यस्थान (कोटा) येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रतीक शंकर देशमुख याने ८५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले होते. तर यापूर्वी झालेल्या शालेय राज्य स्पर्धेत सुवर्ण व राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. यानिमित्त मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने बाळा भेगडे यांच्या हस्ते प्रतीक देशमुख यांना ‘युवा क्रीडारत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मावळ तालुका कुस्तीगीर संघातर्फे बाळा भेगडे यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

यावेळी ऑलिम्पिकवीर व मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मारुती आडकर, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन चंद्रकांत सातकर, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संभाजी राक्षे, सचिव बंडू येवले, उपाध्यक्ष खंडू वाळूंज, मनोज येवले, तानाजी कारके, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ टिळे, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवक अध्यक्ष संदीप काकडे, कालिदास दाभाडे, नथू घारे, सुनील दाभाडे, संतोष देशमुख, नवनाथ फाळक, मारुती देशमुख उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like