Lonavala : खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत युवा मल्ल प्रतीक देशमुख याने पटकावले रौप्यपदक

युवामल्ल प्रतीक देशमुख व अतिश आडकर यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज- आसाम गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल प्रतीक शंकर देशमुख याने फ्रीस्टाईल कुस्ती प्रकरात 80 किलो वजनीगटात रौप्यपदक पटकावले आहे. प्रतीक देशमुख आणि शिवली गावचा युवामल्ल अतिश रामदास आडकर याची बिहार, पटणा येथे होणार्‍या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आसाम गुवाहाटीयेथे खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा राष्ट्रीय युवामल्ल प्रतीक देशमुख याने रौप्यपदक पटकावले आहे. प्रतीकला पहिल्या फेरीत बाय मिळाल्याने त्याचा दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित झाला होता. दुसर्‍या फेरीत प्रतीकने उत्तरप्रदेशच्या आयुष याचा 8-2 ने, तर तिसर्‍या फेरीत हरियाणाच्या रोहितचा 9-3 अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.

अंतिम फेरीत प्रतीकची गाठ दिल्लीच्या विकास याच्याशी पडली. या लढतीत पहिल्या फेरीत प्रतीकने 2-0 अशी आघाडी घेतली होती, दुसर्‍या फेरीला आक्रमक सुरूवात झाली. यावेळी खेळताना प्रतीकच्या डोळ्याला दुखापत झाल्याने दिल्लीच्या विकासने प्रतीकच्या दुखापतीचा फायदा घेत प्रतीकचा 7-3 असा पराभव केल्याने प्रतीकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. यापूर्वी प्रतीकने राज्यस्थान (कोटा) येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कॅडेट (सबज्युनिअर) विभागात 85किलो वजनी सुवर्णपदक तर दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. प्रतीकने चार राष्ट्रीय स्पर्धांपैकी तीन स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे.

बिहार (पटणा) येथे 26ते 29 जानेवारी या कालावधीत होणार्‍या सब ज्यूनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी फ्रिस्टाईल विभागाच्या 80 किलो वजनी गटात प्रतीक देशमुख याची तर वरिष्ठ राष्ट्रीय ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेत 71 किलो वजनी गटात शिवली गावचा युवामल्ल अतिश रामदास आडकर याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. अतिश याने तीन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पदकांची कमाई केली असून, अतिश याची ही पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा आहे.

प्रतीक हा पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुलात कुस्तीचे धडे घेत आहे. त्याला वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे, किशोर नखाते, नरेंदर कुमार, सदानंद, दिलीप पडवळ, निलेश पाटील, परीक्षित पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर अतिश हा मारूंजी येथील पै. अमोलभाऊ बुचडे कुस्ती संकुल येथे रुस्तम ए हिंद पै. अमोल बुचडे व प्रा. किसन बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.