Talegaon Dabhade : ‘विद्यार्थ्यांनो, सतत जिंकण्याचा विचार मनात आणा !’- डॉ. संजय उपाध्ये

मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेेचा समारोप

एमपीसी न्यूज- परंपरांमध्ये जगताना काळानुसार वर्तमानातील बदल आचरणात आणायला हवेत. स्वत:च्या उणिवांवर सतत चर्चा करण्यामुळे आत्मविश्वास कमी होईल. जीवन जगत असताना सतत जिंकण्याचा विचार मनात आणा. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. असे आवाहन व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्यावतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेेचा समारोप ज्येष्ठ प्रवचनकार व लेखक डॉ. संजय उपाध्ये यांच्या ‘जिंकलो ऐसें म्हणा’ व्याख्यानाने झाला. सुमधुर शब्द, ओघवती शैली, उत्तम सादरीकरण, गमतीजमती, विनोदी संधीविग्रहाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, नियोजन समिती अध्यक्ष विलास काळोखे,संस्थेचे खजिनदार चंद्रकांत शेटे, संस्थेचे विश्वस्त शैलेश शाह, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंद खळदे, महाविद्यालय विकास समिती सदस्य निरुपा कानिटकर, चंद्रभान खळदे, संदीप काकडे आदी उपस्थित होते.

डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, जो जिंकतो तोच जगण्याची प्रवृत्ती कायम ठेवतो. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्यकाळ माहिती नाही; त्यामुळे वर्तमानात जगा. जीवनात आनंद मिळविण्यासाठी पैसा हवा. मात्र, पैसा हे साधन आहे साध्य नाही. हे प्रत्येकास कळाले पाहिजे. मातृभाषेचा परिपक्व अभ्यास पाहिजे, तरच अन्य भाषा शिकून त्यातील सौंदर्य शोधण्याची विशिष्ट दृष्टी लाभते.

चित्रपट, नाटक आणि समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव असे सध्याचे युग आहे. शिक्षण पद्धतीत बदल होत असल्याने शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे शिक्षकांना सातत्याने प्रशिक्षणाची गरज आहे. शिक्षकाने पुढच्या पिढीला घडवले पाहिजे. शिक्षक बहुआयामी हवा, त्याच्याकडे ज्ञान असावे, मात्र अहंकार असू नये. विचारात लवचिकता ठेवा, कायम विद्यार्थी राहून शिकण्याची उर्मी ठेवा आणि उगवणारा प्रत्येक दिवस, क्षण परत येणार नसल्याने समाधानी आनंदी जगा, असे आवाहन डॉ. उपाध्ये यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. त्यांनी व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरचा वैचारिक मेवा मिळून विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बणण्यास मदत होते असे सांगितले. पाहुण्यांचा परिचय प्रा उत्तम खाडप व प्रा के डी जाधव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा विजय खेडकर व प्रा हर्षदा पाटील यांनी केले तर आभार महाविद्यालय विकास समिती सदस्य निरुपा कानिटकर यांनी मानले.

यावेळी संस्थेचे खजिनदार चंद्रकांत शेटे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, संयोजन समिती सदस्य, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.