Lonavla :नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस आघाडीला धक्का देत शिवसेनेची दोन सभापती पदावर बाजी

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडीत आज सत्ताधारी गटातील भाजप आणि काँग्रेस यांना धक्का देत विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने महत्वाच्या दोन सभापती पदांवर बाजी मारली तर शिवसेनेला संलग्न असलेल्या एका अपक्षाने सभापती तर दुसर्‍याने उपसभापती पद मिळविल्याने सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी गटातील भाजपाला आणि काँग्रेसला प्रत्येकी एका सभापती पदावर समाधान मानावे लागले. सत्ताधारी गटातील भाजपाचे तिन सदस्य ऐनवेळी फुटल्याने ही उलथापालथ झाली.

मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांच्या पिठासनाखाली सभापती पदाची निवडणूक लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार व सदस्य उपस्थित होते. विहित कालावधीमध्ये शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पदाकरिता काँग्रेस पक्षाच्या आरोही तळेगावकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदाकरिता भाजपाच्या अर्पणा बुटाला यांचा तर उपसभापती पदाकरिता अपक्ष नगरसेविका अंजना कडू यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बांधकाम समिती : (सुनिल इंगूळकर सभापती) : या समितीच्या सभापती पदाकरिता शिवसेनेचे सुनिल इंगूळकर व आरपीआयचे दिलीप दामोदरे यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या वेळेपर्यत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने सभापती पदाकरिता मतदान घेण्यात आले. यामध्ये सुनिल इंगूळकर यांना इंगूळकर यांच्यासह भाजपाच्या नगरसेविका गौरी मावकर, शिवसेनेच्या कल्पना आखाडे व अपक्ष अंजना कडू या चार जणांनी मतदान केले तर दिलीप दामोदरे यांना दामोदरे यांच्यासह काँग्रेसच्या संध्या खंडेलवाल व सुर्वणा अकोलकर या तीन जणांनी मतदान केले. भाजप नगरसेवक भरत हारपुडे मतदानास गैरहजर राहिले. यामुळे सुनिल इंगूळकर यांची सभापती पदावर निवड जाहिर करण्यात आली.

स्वच्छता वैदयक व सार्वजनिक आरोग्य सिंधू परदेशी (सभापती) :
शिवसेनेच्या सिंधू परदेशी व भाजपाचे देविदास कडू याचे सभापती पदाकरिता अर्ज दाखल झाले होते. माघार कालावधीपर्यत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने झालेल्या मतदानात सिंधू परदेशी यांना त्यांच्यासह भाजपाच्या गौरी मावकर, शिवसेनेच्या शादान चौधरी व अपक्ष अंजना कडू यांनी मतदान केले. तर देविदास कडू यांना कडू यांच्यासह काँग्रेसचे संजय घोणे व पुजा गायकवाड यांनी मतदान केले. भाजपाचे भरत हारपुडे हे मतदानाला गैरहजर राहिले.

पाणी पुरवठा व जलनिस्सारण = सेजल परमार (सभापती) :
या समितीच्या सभापती पदाकरिता अपक्ष नगरसेविका सेजल परमार व काँग्रेसचे नगरसेवक सुधिर शिर्के यांनी अर्ज भरले होते. विहित कालावधीत माघार न झाल्याने सभापती पदाकरिता मतदान घेण्यात आले. यामध्ये सेजल परमार यांना परमार यांच्यासह भाजपाच्या गौरी मावकर, शिवसेनेच्या शादान चौधरी व कल्पना आखाडे यांनी मतदान केले तर काँग्रेसचे सुधिर शिर्के यांना शिर्के यांच्यासह भाजपाच्या रचना सिनकर व काँग्रेसच्या सुर्वणा अकोलकर यांनी मतदान केले. भाजपा नगरसेविका जयश्री आहेर ह्या मतदानाला गैरहजर राहिल्या.

यासह नियोजन समिती : श्रीधर पुजारी (पदसिध्द अध्यक्ष) सदस्य म्हणून ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर निखिल कविश्वर, संजय घोणे, माणिक मराठे, मंदा सोनवणे स्थायी समितीच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव (पदसिध्द अध्यक्ष) : सदस्य श्रीधर पुजारी, सुनिल इंगूळकर, आरोही तळेगावकर, सेजल परमार, सिंधू परदेशी, अर्पणा बुटाला, पुजा गायकवाड, राजु बच्चे, नितिन आगरवाल यांची निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.