Mumbai : ‘शारिरीक अंतर जरूर राखा पण मनानं दूर जाऊ नका’ मनसेची नागरिकांना भावनिक साद

एमपीसी न्यूज – ‘करोनाच्या अमानवी संकटाच्या काळात समाजभान जपा. दोन माणसांमधलं शारिरीक अंतर जरूर राखा पण मनानं दूर जाऊ नका. करोनाच्या रुग्णांशी सौजन्यानं वागा,’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एका खास व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना केलं आहे.

कोरोना या विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूंपासून बचावासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सरकारने सुद्धा खबरदारी म्हणून लॉकडाऊन लागू केला आहे.

काही ठिकाणी ‘सोशल डिस्टन्सिंग’चा भलताच अर्थ लावून करोनाबाधित रुग्णांना वा त्यांच्या कुटुंबीयांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जात आहे. त्यांना वाळीत टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मनसेनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक वेगळा व्हिडिओ शेअर केला आहे.

‘हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेचा आधार घेऊन, ‘कोरोनाच्या संकटाशी विज्ञान आपल्या परीनं लढत आहे. मात्र, आपण या अमानवी संकटात समाजभान जपायला हवं. कोरोना रुग्णांशी सौजन्यानं वागायला हवं, असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.