Ganeshotsav २०२३ : गुरुवार पेठेत साकारले मांढरदेवी काळूबाई मंदिर

गणेशभक्तांना पाहण्यासाठी आवाहन

एमपीसी न्यूज- लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganeshotsav २०२३) आगमन आज मोठ्या उत्साहात झाले. गणेशोत्सव म्हटले की देखावे आले. हलत्या, जिवंत देखाव्यांची उज्ज्वल परंपरा पुण्याच्या गणेशोत्सवाला असते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत पुणेकर गणेशभक्त घरातदेखील मोठ्या हौसेने देखावे उभारतात. गुरुवार पेठेतील पंचमुखी मारुती मंदिर येथे राहणाऱ्या किरण चव्हाण यांच्या घरी मांढरदेवी काळूबाई मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

Podcast : देशोदेशींचे आणि विविध धर्मांतील गणपती

किरण दीपक चव्हाण, कुणाल दीपक गादेकर आणि विक्रांत अरविंद खाडे यांनी हा देखावा साकार केला आहे. शौर्य किरण चव्हाण या लहानग्याच्या कल्पनेतून हा देखावा साकारला आहे. याआधीही किरण चव्हाण यांनी शंकर महाराज मठ, जागरण गोंधळ, सावरखेड एक गाव असे देखावे साकारले आहेत. या देखाव्यासाठी तीनही मित्रांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. पुठ्ठा, काड्या, रंग, कागद आदी गोष्टींचा यामध्ये वापर करण्यात आला असून, पर्यावरणपूरक हा देखावा लक्ष वेधून घेत आहे.

हा देखावा साकारताना अगदी बारीकसारीक गोष्टींवर लक्षपूर्वक काम केले आहे. देवस्थानाची कमान, डोंगर, मंदिर परिसर, गाभारा, दुकाने, तुळशी वृंदावन, सूचनाफलक अशा सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने बनवल्या आहेत. देवीची मूर्ती चांदीपासून बनवली असून, गाभारा सिल्व्हर फॉईल पेपर वापरून केला आहे. त्याला चांदीयुक्त गाभाऱ्याचे रूप प्राप्त झाले आहे.

किरण चव्हाण म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून आवड म्हणून देखावे बनवत आहोत. यंदा मांढरदेवी काळूबाईचा देखावा बनवण्याची संकल्पना शौर्यने मांडली. आम्ही तिघेही प्रत्यक्ष मांढरदेवीला जाऊन पाहणी करून आलो. त्यानंतर एक आराखडा तयार करून त्यानुसार काम सुरु केले. १५ ऑगस्ट पासून यावर काम सुरु होते. सगळ्या गोष्टी अचूक करता आल्या, याचे समाधान आहे. साधारण आठ बाय दहा फूट एवढ्या जागेत हा देखावा आहे. मंदिर परिसरातील प्रत्येक गोष्ट बारकाईने टिपण्याचा आणि ती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.”

विक्रांत खाडे म्हणाले, “प्रचंड मेहनतीने हा देखावा साकार केला आहे. देवीची मूर्ती चांदीची असून, देखाव्यातील महत्वाच्या वस्तू गणेशोत्सव झाल्यानंतर देवस्थानाला देणगी स्वरूपात देण्यात येणार आहेत. अधिकाधिक गणेशभक्तांनी हा देखावा पाहण्यासाठी ९३ गुरुवार पेठ, पंचमुखी मारुती मंदिर, पुणे येथे भेट द्यावी, असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.