Election Result 2022 Analysis: मणिपूरमध्ये  भाजप पुन्हा सत्तेत

एमपीसी न्यूज (राजन वडके) – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. पंजाब वगळता अन्य चार राज्यांत भाजपने पुन्हा विजयाचा झेंडा रोवला आहे. पूर्वोत्तरभारतातील मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ पुन्हा फुलले आहे.

विधानसभेच्या ६० पैकी ३२ जागा जिंकत सत्ता हस्तगत केली आहे.  मागील वर्षी काँग्रेसने सर्वाधिक २८ जागा जिंकल्या होत्या. मात्र भाजपने २१ जागा जिंकूनही नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ, ५ जागा) आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी, ७ जागा) यांना बरोबर घेऊन सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडून हिसकावून घेतल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असले तरी त्यांना गेल्या वर्षी साथ दिलेल्या एनपीएफ आणि एनपीपी यांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे. आगामी २०२४ची लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्यासाठीची मशागत करण्यासाठी हे आवश्यक ठरणार आहे.

मणिपूरमध्ये पठारी आणि पहाडी अशा दोन भागांत लोकवस्ती आहे. दोन्ही भागांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यातच घुसखोरी, फुटीरतावाद, दहशतवादाची ही मोठी समस्या तेथे आहे. पठाराच्या किंवा मैदानी भागात हिंदू, मैतेई समाजाचे तर पहाडी भागात नागा, कुकीझोमी आदी ३६ प्रकारच्या जनजातींचे लोक राहतात. हे सर्व जण एकाच देशाचे एकाच राज्याचे असले तरी या दोन्ही भागातील लोकांमध्ये मानसिक एकता दिसत नाही. त्याशिवाय दळणवळण, नागरी सुविधा, आरोग्य सुविधा आदी समस्या आहेत. भाजपने गेल्या पाच वर्षांत सत्ता राबविताना प्रामुख्याने दोन भागांतील लोकांमधील मानसिक दरी दूर करण्याकडे लक्ष दिले. विकास कामांवर भर दिला. त्या जोरावर भाजप यंदा स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 12 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रचार यंत्रणा राबविताना पक्षाने विविध संघटनांच्या स्थानिक नेत्यांना प्रचारात बरोबर घेतले. त्यामुळे त्यांच्या मनांत भारतीयत्वाची भावना जागृत होण्यास मदत होऊन एकमेकांवरील विश्वासही वाढल्याचे चित्र दिसले होते. त्यात प्रचारात मोदी फॅक्टर ही  मोदी फॅक्टर महत्वाचा ठरला. भाजपला बहुमत मिळण्यासाठी त्यांचा विकास मंत्र प्रभावी ठरला. त्यामुळे पक्षाला पुन्हा बहुमत मिळण्याचा विश्वास प्रदेशाध्यक्षा ए. शारदा देवी यांनी व्यक्त केला होता.  मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या रूपाने भाजपला गेल्या निवडणुकीत प्रभावी नेतृत्व मिळाले आहे. त्याचाही उपयोग पक्षाला झाला. या निवडणुकीतही हिंगाँग मतदारसंघातून ते पुन्हा विधानसभेवर गेले आहेत.

काँग्रेस पक्षाला मणिपूरमध्ये चांगलाच धोबीपछाड बसला. येथेही काँग्रेसला पक्षांतर्गत वादाचा फटका बसला. केंद्र आणि राज्यातील सक्षम नेतृत्वाअभावी प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबविता आली नाही. मागील निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवूनही सत्तेपासून दूर राहावे लागले. परंतु, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ठोस कामगिरी करता आली नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपवर टीकेची धार ही बोथट झाली होती. त्यामुळे मतदारांचा विश्वास संपादन करण्यात उमेदवार आणि नेते कमी पडले. एकूणच मणिपूरमध्येही काँग्रेसचा प्रभाव घटल्याचे चित्र होते. या सर्वांचा परिणाम पक्षाच्या दारूण पराभवात झाला. एनपीपी आणि एनपीएफ या पक्षांच्या कामगिरीत मात्र यंदा सुधारणा झाली. भाजपबरोबर युती करून सत्तेत राहिल्याने प्रचारात राज्यातील विकासाचा अजेंड्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. स्थानिक पक्ष असल्यामुळे मतदारांचा विश्वास संपदन केल्याने काँग्रेसच्या आधीच्या जागा त्यांना जिंकता आल्या. भाजपच्या बहुमतामुळे पुन्हा सत्तेत जाण्याची संधी या दोन्ही पक्षांना मिळाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या कुकी पिपल्स अलायन्स (केपीए) या पक्षानेही त्यांचे खाते उघडले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी मागील निवडणुकीपासून अन्य राज्यांत त्यांचे उमेदवार उभे करण्यास सुरवात केली आहे. अरुणाचल प्रदेशनंतर आता मणिपूरमध्ये जेडीयूला ६ जागा मिळाल्या आहेत. तर तृणमूल काँग्रेसने एक जागा पटकावली आहे. ही दोन्ही पक्षांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. त्याचबरोबर जेडीयूला विरोधी पक्षनतेपद  पदरात पाडून घेता येणार आहे. त्यामुळे पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न केले जातील.पूर्वोत्तर भारतांतील राज्यांवर भाजपने लक्ष केंद्रित केले असून, पक्षाची वाढती ताकद आणि काँग्रेसचा कमी होत असलेला प्रभाव आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीयदृष्ट्या महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.