Manobodh by Priya Shende Part 68 : बळे आगळा राम कोदंडधारी

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक  68 (Manobodh by Priya Shende Part 68)

बळे आगळा राम कोदंडधारी

महाकाळ विक्राळ तोही थरारी

पुढे मानवा किंकरा कोण केवां

प्रभाते मनी राम चिंतीत जावा

या श्लोकामध्ये (Manobodh by Priya Shende Part 68) समर्थांनी भगवंताच्या पराक्रमाचं आणि सामर्थ्याचं वर्णन केलेय.  पहिल्या चरणात ते म्हणताहेत की, “बळे आगळा राम कोदंडधारी”.  श्रीरामाचं वर्णन मागच्या श्लोकात करताना त्यांनी, तो आपलासा वाटणारा सावळ्या रंगाचा राम हा सौंदर्यवान आहे असं सांगितलं होतं.

तर आता ते म्हणताहेत की, हा श्रीराम आगळावेगळा आहे, कारण तो एकीकडे कोदंडधारी म्हणजे खांद्यावर धनुष्य धारण करणारा आहे. तर दुसरीकडे तो भक्तांना तारणारा आहे.  दुष्टांचा संहार करणारा आहे आणि सकल जनांचे रक्षण करणारा आहे.  म्हणून तो आगळा वेगळा आहे.  तो अत्यंत सामर्थ्यशील आहे.

तो इतका पराक्रमी आणि सामर्थ्यवान आहे की साक्षात काळ त्याच्यापुढे थरथर कापतो.  म्हणून दुसर्‍या चरणात समर्थ म्हणताहेत की,” महाकाळ विक्राळ तोही थरारी”.  महाकाळ म्हणजे साक्षात मृत्यू. मृत्यू कसा आहे तर, तो विक्राळ आहे, भयावह आहे. अक्राळविक्राळ भयंकर असा आहे.

प्रत्येक माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते तर ती मृत्यूची.. मृत्यूच्या विचाराने पण माणूस भयभीत होतो.  माणसाचा मृत्यू अटळ आहे, आणि त्या मृत्यूपुढे माणसाचं काही चालत नाही.  तर असा हा महाकाळ येणार, या कल्पनेने सुद्धा माणूस थरथर कापायला लागतो.

असा हा अक्राळविक्राळ महाकाळ, हा फक्त भगवंताला घाबरतो.  महाकाळ भगवंता पुढे थरथर कापायला लागतो.  इतका हा भगवंत प्रचंड सामर्थ्यवान आहे.  भगवंता मध्ये इतके सामर्थ्य आहे की तो काळाला देखील आपल्या ताब्यात ठेवतो. जो प्रत्यक्ष मृत्युला आपल्या कह्यात ठेवू शकतो, तो किती सामर्थ्यवान असेल ते कल्पना करा.

तिसऱ्या चरणांत समर्थ म्हणतात की,”पुढे मानवा किंकरा कोण केवां”. म्हणजेच अशा या पराक्रमी भगवंता पुढे मानव काय आणि दानव काय यांच्या काय कथा?  केवां म्हणजे कथा.  मानव आणि दानव यांची शक्ती अतिशय क्षुल्लक आहे, या भगवंता पुढे.   मनुष्य स्वतःच्या बळावर कधी जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेऊ शकत नाही.  त्यासाठी भगवंताचाच आधार त्याला घ्यावा लागतो. भगवंताचीच गरज त्याला लागते.

समर्थ आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून देतात की, जे जे काही जन्माला आलेलं आहे,  ते विनाश पावणार आहे.  चिरंजीव या पृथ्वीतलावर काहीच नाही.  काळा पुढे कोणाचेच काही चालत नाही, आणि हा काळ फक्त परमेश्वरालाच घाबरतो.

त्यामुळे भगवंताची भक्ती करून, त्याला शरण जाऊन, मृत्यूच्या फेऱ्यातून म्हणजेच जन्माच्या फेऱ्यातून सुटका करून घेता येईल.  कारण मृत्यूच नाही, तर पुन्हा जन्म मिळण्याचा प्रश्नच नाही. म्हणजेच मोक्ष होय.

यासाठी प्रभातसमयी परमेश्वराचे चिंतन करा, असं समर्थ सांगत आहेत.  प्रभातसमयी म्हणजेच पहाटे प्रभूचं चिंतन केलं, म्हणजेच शांत वेळी आपण देवाचं नामस्मरण केलं, तर मन प्रसन्न होतं आणि दिवस पण आनंदात जातो.

सुरुवात तर चांगली झाली तर आपण केलेल्या कामांना ईश्वराचा अधिष्ठान प्राप्त होतं.  तो परमेश्वराचा आशीर्वाद असतो.  जिथे परमेश्वराचा आशीर्वाद आहे, ते काम यशस्वीपणे पूर्णत्वाला जाणारच.  सकाळी जे आपण करतो, त्याचा परिणाम दिवसभर आपल्यावर होत असतो. जसं की सकाळीच कोणाशी भांडण झालं तर दिवस आपलाच वाईट जातो.  म्हणून समर्थ (Manobodh by Priya Shende Part 68) सांगताहेत की,”प्रभाते मनी राम चिंतीत जावा”.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.