Manobodh by Priya Shende Part 76 : मनोबोध भाग 76 – नव्हे कर्म ना धर्म ना योग काही

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 76 – Manobodh by Priya Shende Part 76

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही
म्हणे दास विश्वास नामे धरावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा.

श्लोक क्रमांक 76 हा 67 ते 76 या संचामधला शेवटचा श्लोक.  ज्याचं चौथं चरण हे प्रभाते मनी राम चिंतीत जावा हे समर्थांनी रचलंय. या श्लोकातही समर्थ आश्वासकतेने सांगत आहेत की रामनामावर विश्वास ठेवा. बाकी कसल्या अवघड, न सोसणाऱ्या वाटांनी पुढे जाऊ नका. सहज-सोप्या रामनामावर नितांत विश्वास ठेवा.

संसारी माणसाची अवस्था मोठी विचित्र असते.  तो एक काही आपल्या आयुष्यात नीट पार पाडू शकत नाही. समर्थ पहिल्या चरणात म्हणतात (Manobodh by Priya Shende Part 76) की, “नव्हे कर्म ना धर्म ना योग काही, नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही”.

आपल्या वाट्याला आलेलं कर्म म्हणजे काम, धड करून होत नाही, की धर्माचे काम धड होत नाही. ना योगसाधनेचं काम करतो माणूस.  नुसताच संसारात गुरफटतो. त्याच्या हातून क्रियामाण कर्म होता होताच कठीण होऊन बसतं. मनात असूनही धर्माचं काही करू शकत नाही.  व्रतवैकल्य, पूजापाठ, कीर्तन-प्रवचन, उपास-तपास, ध्यानधारणा, योगसाधना हे काही त्याच्या हातून घडत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे करावसं वाटत असलं तरी ते करू शकत नाही.  माणूस धड भोगात रमत नाही आणि ना ही त्याला त्याग साध्य होतो.  त्याची अवस्था त्रिशंकू सारखी होते तो ऐहीक सुखात रमला तर त्याला त्याग आठवतो पण सुख सोडत पण नाही.  त्यामुळे तो धड इकडचा ना धड तिकडचा राहतो. त्याला भोग ही मानवत नाही आणि त्यागही मानवत नाही.

काही कोणी सांगितलेलं त्याला पटत नाही आणि काही बघायला त्याला जमत नाही.  एखादी गोष्ट पटली तरी शंका मनात डोकावतात.  इथे पण त्याची द्विधा मनस्थिती होते. एकूणच सगळ्या ठिकाणी मनाची द्विधा परिस्थिती असेल तर विश्वास ठेवायचा कसा? खरं काय खोटं काय हे त्याला कसं समजणार?

यासाठीच समर्थ सांगताहेत की विश्वास नामी धरावा. म्हणजेच विश्वास हा नामावर ठेवा.  रामनामावर ठेवा. कारण फक्त रामनामच तुम्हाला तारू शकतं. म्हणूनच समर्थ सांगताहेत, की आपण उठल्यापासून म्हणजेच प्रभातसमयी पासूनच रामाचे चिंतन करावे.  म्हणजे मग दिवसभर त्याचेच विचार डोक्यात येतात आपली प्रगती होते आणि मुक्तीकडे वाटचाल व्हायला सुरुवात होते.

जय जय रघुवीर समर्थ
प्रिया शेंडे
मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.