Pune : अण्णासाहेबांच्या महामंडळाला आघाडीने बळ दिले असते तर मराठा समाजाला मोर्चे काढावे लागले नसते : नरेंद्र पाटील

एमपीसी न्यूज – काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात पंधरा वर्षे सत्ता होती, आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी ने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाला अक्षरशः कचर्‍याच्या डब्यात टाकले. त्याचवेळी महामंडळाला बळ दिले असते तर मराठा समाजातील तरुणांना रस्त्यांवर येवून आज सारखे मोर्चे काढण्याची वेळ आली नसती असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्या पहिल्याच दौऱ्यात सांगली येथे केले.

महामंडळाच्या योजनांचा प्रचार प्रसार जनजागृती आणि प्रशासन, बँकांना नवउद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सहानुभूती दाखवावी असे आवाहन करण्यासाठी महामंडळाचे नूतन अध्यक्ष नरेंद्र पाटील सर्व जिल्ह्यात दौरे करणार आहेत. सांगली दौऱ्यात त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे स्थानिक भाजपा ने आणि मराठा सकल मोर्चाच्या पदाधिकाऱयांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

श्री नरेंद्र पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, काँग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात आर्थिक महामंडळात कर्ज देताना अनेक चुकीचे प्रकार घडले. टक्केवारी दिल्याशिवाय प्रकरणे मंजूर झाली नाहीत. आता कर्ज मंजूर करण्यासाठी टक्केवारी किंवा दलाली चालणार नाही.

दरम्यान कर्ज प्रकरणास टाळणार्‍या बँकांची जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घ्यावी. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले, मराठा समाजातील उद्योग करू इच्छिणार्‍या, व्यवसायासाठी प्रयत्नशील तरूणांना महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मंजूर व्हावे यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. तरीही काही बँकाकडून कर्ज प्रकरणे मंजूरीबाबत सकारात्मक प्रतिसाद येत नाही. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून कर्ज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सांगावे. कर्जप्रकरण मंजूरीसाठी टक्केवारी मागत असल्याचे प्रकार समोर आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.

महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणार्या कर्जाच्या परताव्याबाबत शासन स्वत: हमी घेणार आहे. याबाबत मंगळवारीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शासन आदेश काढण्याविषयी विनंती करणार आहे. आठवड्याभरात कर्ज हमीबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, आ. जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षातील महान नेते आहेत. त्यांनी माझ्या वडिलांच्या नावाने असणार्‍या महामंडळाला कमी समजू नये.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.