Maval : पाच वर्षांपासून आदिवासी कुटुंबांना मंदिर प्रवेशास बंदी; मावळ तालुक्यातील बेलज गावातील घटना

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रकरणाला फुटणार वाचा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील टाकवे जवळील बेलज या गावातील काही आदिवासी कुटुंबांना गावातील मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे दान तसेच पूजा देखील स्वीकारली जात नाही. या धक्कादायक घटनेला मावळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने वाचा फोडण्यात येणार आहे. या आदिवासी कुटुंबांना न्याय मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांची मंगळवारी (दि. 8) भेट घेणार आहेत.

टाकवे गावाजवळ बेलज या गावात काही आदिवासी कुटुंब वास्तव्य करतात. गावात ग्रामदैवत विठ्ठल मंदिर आहे. मागील सुमारे पाच वर्षांपासून गावातील नागरीक विठ्ठल मंदिरात या आदिवासी कुटुंबांना प्रवेश नाकारत आहेत. तसेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जात नाही. मंदिरात होणा-या काकड आरतीला ठराविक लोकांना प्रवेश नाकारण्यात येत आहे.

गावातील नागरिक जाणीवपूर्वक या आदिवासी नागरिकांसोबत भेदभाव करत आहेत. आदिवासी समाजाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची देखील धमकी दिली जात आहे. पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना काळिमा फासणारी आहे.हा प्रकार तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक आणि संतोष दाभाडे पाटील यांना समजताच त्यांनी संबंधित पीडित कुटुंबियांची भेट घेतली. दोन्ही कार्यकर्ते मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे, तहसीलदार रणजित देसाई, नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांची भेट घेऊन संबंधितांवर योग्य ते शासन करण्याची विनंती करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.