Maval : पार्थ पवार यांचे खासगी फोटो ‘व्हायरल’ करणा-याविरुद्ध गुन्हा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांची वैयक्तिक बदनामी करणारे फोटो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीसीएमसी शिवसेना फेसबुक पेजवरील इसम, निखील देवकाते-पाटील, श्रीमंत व इतर व्हाट्सअप् ग्रुप वर फोटो व्हायरल करणा-यांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली होती.

विरोधी पक्षाने युवा उमेदवार पार्थ पवार यांची विनाकारण बदनामी करण्यासाठी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील खासगी फोटो शिवसेनेच्या फेसबुक पेज तसेच व्हाट्सअप ग्रुप यासारख्या सोशल मीडियात व्हायरल केले. निवडणुकीच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे फोटो व्हायरल होत असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे चारित्र्य मलिन होत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फोटो, व्हिडीओ व्हायरल करणा-यांचा शोध घेतला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.