Maval : मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे

खासदार बारणे यांच्या मावळ तालुक्यातील प्रचाराचा शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ

एमपीसी न्यूज- बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देता गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवारी) वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार बारणे यांच्या प्रचाराचा शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गो-हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनराध्यक्ष सुनील शेळके, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजाजन चिंचवडे, पिंपरी-चिंचवडचे शहरप्रमुख योगेश बाबर, रवींद्र भेगडे, बाळासाहेब जांभूळकर, शंकरराव शेलार, संतोष दाभाडे, अविनाश बवरे, शांताराम कदम, गुलाब म्हाळसकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, सभापती सुरेखा कुंभार, नंदाताई सातकर, एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, भारत ठाकूर, चंद्रशेखर भोसले, बाळासाहेब घोटकुले, रामनाथ वारिंगे, माऊली शिंदे आदी उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले की, अजित पवार यांना पहिल्यांदा खासदारकीला निवडून देऊन 1991 मध्ये बारामतीने केलेली चूक पुन्हा मावळने करू नये, भ्रष्टाचाराचा कळस करणाऱ्या व्यक्तीला निवडून दिल्याने महाराष्ट्र आम्हाला कधीही माफ करणार नाही. आता त्यांच्या मुलाला निवडून देऊन मावळवासीयांनी पुन्हा ती चूक करू नये.

महाराष्ट्रात पबमध्ये नाचणारा मुलगा रथयात्रेत नाचू लागला आहे. अलिशान मोटारींमधून फिरणारा मुलगा आता बैलगाडी चालवू लागलाय. बिघडलेला मुलगा सुधारला तरी निवडणूक सार्थकी लागेल, असा टोला शिवतारे यांनी लगावला. आजोबा म्हणतात नातवाला निवडून द्या, नातू म्हणतो, आजोबांना पंतप्रधान करा. आमच्या प्रगतीत तुमची प्रगती आहे. आता तुम्हीच सांगा गेल्या 50 वर्षात कोणाची प्रगती झाली, असा सवाल करीत त्यांनी पवार कुटुंबियावर टीका केली.

डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या की, मावळची जनता साधी भोळी नाही. अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्ये पराभूत केले. आता मावळात त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. पार्थला मिसगाईड केले जात आहे. मीडियाने दखल घ्यावी यासाठीची आगतिकता केविलवाणी आहे. राष्ट्रवादीने अत्यंत अपरिपक्व नेतृत्व समोर ठेवले आहे, अशी टीका त्यांनी केली. मावळ गोळीबार प्रकरणी आघाडी सरकार निर्घृणपणे वागले. पुरावे देऊनही गोळीबाराचे समर्थन केले गेले. कोणत्या तोंडाने लेकरासाठी मते मागता, असा संतप्त सवालही गोऱ्हे यांनी केला. पुणे जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी उणे करायचे आहे, असे त्या म्हणाल्या.

उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, ”ही निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. राष्ट्रवादीचे उरण, पनवेल मध्ये डिपॉझिट जप्त झाले होते. कर्जतमध्ये शिवसेना आमदार आहे. मावळने सर्वात जास्त आघाडी दिली होती. चिंचवडमध्ये भाजपचा तर पिंपरीत शिवसेना आमदार आहे. संपूर्ण मतदारसंघावर युतीचे प्राबल्य आहे. त्यामुळे आपण शंभर टक्के विजयी होणार असून ते सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही”

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय असो की मतदारसंघातील समस्या आपण लोकसभेत मांडल्या. त्यासाठी पाठपुरावा केला आहे. काम करणा-या सच्च्या कार्यकर्त्याला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

बाळा भेगडे म्हणाले, ”नातू आजोबाना खेळवतोय. या नातवाला परत कायमचे बारामतीला पाठवा. उगाचच प्रसिद्धीसाठी पळापळ करतोय तर त्याला बारामतीपर्यंत पळू द्या. मावळच्या नादी लागू नका”

आम्ही मावळचा विकास केला आहे. हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे, असे त्यांनी सांगितले. गोळीबाराचे पाप अजित पवार यांनीच केले असून भूमीपुत्रांना उध्वस्त करणा-याला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. पुणे जिल्हा पवारमुक्त करणार असून चारही खासदार युतीचे निवडून आणणार असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.

सूर्यकांत वाघमारे म्हणाले, ”महायुद्धाला सुरूवात झाली आहे. देशहिताची ही निवडणूक आहे. शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचे पाप करणा-यांविरुद्ध हा लढा असून बारामतीचे पार्सल परत पाठवा”. भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे स्वागत केले. तर, गणेश भेगडे यांनी प्रास्ताविक केले. तर, यदुनाथ चोरगे यांनी सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.