Maval: राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ; मित्र पक्ष शेकापला गळती

निवडणुकीच्या धामधुमीत शेकापच्या तीन नगरसेवकांचा भाजपत प्रवेश

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्र पक्ष आणि मावळ लोकसभा मतदारसंघात घाटाखाली वर्चस्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गळती लागली आहे.  शेकापच्या पनवेल महापालिकेतील तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. पिंपरी, चिंचवड, मावळ आणि घाटाखालील उरण, पनवेल, कर्जत या तीन मतदारसंघाचा समावेश आहे. घाटाखालील तीन मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची आघाडी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे पवार कुटुंबियांची मावळात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता नाही. नगरसेवकांचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराची मदार घाटाखाली ताकद असलेल्या शेकापवर आहे; मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शेकापला गळती लागली आहे. पनवेल महापालिकेतील तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते केके म्हात्रे, शीला भगत, हेमलता गोवारी,रवी गोवारी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने पनवेलमध्ये शेकापला मोठं धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना देखील त्याचा फटका बसणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.