Maval News: तालुक्यातील 30 नळ पाणीपुरवठा योजनांसाठी 32 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज: तळेगाव दाभाडे – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जल जीवन मिशनअंतर्गत मावळ तालुक्यातील 30 नळ पाणीपुरवठा योजनांसाठी 32 कोटी 19 लाख रुपये खर्चास दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

यापूर्वी पहिल्या टप्प्यात 37 गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे 41 कोटी 69 लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाली असून ती कामे प्रगतीपथावर आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी 30 गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या योजनेसाठी केंद्र शासन 50 टक्के, राज्य शासन 50 टक्के अशी निधीची उपलब्धता राहणार आहे. तालुक्यातील एकूण 184 नळपाणी योजनांचा आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ग्रामीण भागांमध्ये शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जल जीवन मिशन हाती घेण्यात आले आहे.

आमदार सुनील शेळके यांनी या मंजुरीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह महाविकास आघाडी शासनाचे आभार मानले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे नमूद करीत शेळके यांनी त्यांनाही धन्यवाद दिले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या मावळातील पाणीपुरवठा योजना तसेच त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहेत. निगडे 92 लक्ष, कल्हाट 1 कोटी 72 लक्ष, मुंढावरे 32 लक्ष, पुसाणे 1 कोटी 32 लक्ष, शिरे 36 लक्ष, खांडशी 1 कोटी 11 लक्ष, पाचाणे 1 कोटी 51 लक्ष, वळक 66 लक्ष, वडीवळे 40 लक्ष, नवलाख उंबरे 1 कोटी 92 लक्ष, बधलवाडी 1 कोटी 47 लक्ष, जाधववाडी 93 लक्ष, मिंडेवाडी 1 कोटी 19 लक्ष, कुसवली 43 लक्ष, नागाथली 45 लक्ष, बेडसे 97 लक्ष, सांगवी 85 लक्ष, वरसोली 1 कोटी 99 लक्ष, पांगळोली 62 लक्ष, कशाळ 1 कोटी 69 लक्ष, किवळे 1 कोटी 49 लक्ष, मळवंडी ढोरे 74 लक्ष, थुगाव 1 कोटी 08 लक्ष, वारु 86 लक्ष, डाहुली 1 कोटी 30 लक्ष, गोडुंब्रे 88 लक्ष, कडधे 1 कोटी 15 लक्ष, धामणे 1 कोटी 40 लक्ष, आंबेगाव 36 लक्ष, आढले खु. 1 कोटी 97 लक्ष रुपये.

जल जीवन मिशन अंतर्गत शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या निर्णयानुसार पाच कोटी रुपये पर्यंत दरडोई खर्चाच्या निकषात बसणा-या स्वतंत्र व प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जिल्हा पाणी स्वच्छता मिशन यांना आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान केल्यानंतर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सहअध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.