Pimpri News : ‘भ्रष्टाचारी भाजप चले जाव’ ; राष्ट्रवादीचा पालिकेवर भव्य मोर्चा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – ‘भ्रष्टाचारी भाजप चले जाव’, ‘अबकी बार सौ के पार’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका भवनावर आज (दि.18) भव्य मोर्चा काढण्यात आला. चिंचवड स्टेशन ते महापालिका भवनापर्यंत काढलेल्या या मोर्चात पक्षाचे पदाधिकरी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सत्ताधारी भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आणि करदात्या जनतेची लूट केली असा, आरोप यावेळी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केला.

“आमदारांचे ठेकेदार महाठग”, “रस्ते खोदकामात देखील केला महाभ्रष्टाचार”, “भ्रष्टाचारी भाजपचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, “सत्ताधारी भाजपाने जनतेचा विश्वासघात केला”, “करदात्या जनतेची लूट केली, लुटारु भाजपा”, ‘भष्ट्राचारी भाजप चले जाव”, “अबकी बार सौ के पार” असा जोरदार घोषणाबाजी करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात महापालिका भवनावर विराट मोर्चा काढला. मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचे शहरातील नेते, सर्व सेलचे पदाधिकारी एकजुटीने मोर्चात सहभागी झाले होते. सर्वांनी भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार केला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील पहिलाच मोठा मोर्चा यशस्वी झाला.

चिंचवड स्टेशन ते महापालिका भवनापर्यंत काढलेल्या या मोर्चात पक्षाचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चात पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी शहाराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, माजी महापौर, समन्वयक योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, शकुंतला धराडे, नगरसेवक डब्बू आसवानी, मोरेश्वर भोंडवे, नाना काटे, मयुर कलाटे, शाम लांडे विनोद नढे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, नगरसेविका वैशाली काळभोर, संगीता ताम्हाणे, पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका असे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

शहरातील जनता भाजपला जागा दाखविणार – गव्हाणे

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ”शहरातील सर्व घटकांना विश्वास देण्याचे, सर्वांच्या हाताला काम देण्याचे काम शरद पवारसाहेब, अजितदादांनी केले. त्यांच्या नेृत्वाखाली झालेल्या विकासामुळे शहराची जगभरात ओळख निर्माण झाली. बारामतीपेक्षा अजितदादांनी शहरावर प्रेम केले. त्यांच्यामुळेच शहराला बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळाला. शहर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पण, मागील पाच वर्षात भाजपचा कोणता नेता शहरात आला. भाजपने पाच वर्षापूर्वी सत्तेत येण्यासाठी ‘ना भय, ना भ्रष्टाचार’चा नारा दिला. पण, प्रत्यक्षात महापालिकेची लूट केली. या लोकांना अजितदादांनीच मोठे केले होते. या लोकांनी दादांशी गद्दारी केली. शहरातील जनता भाजपला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केवळ जनतेची फसवणूक केली. महापालिकेत फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराशिवाय एकही काम भाजपच्या राजवटीत झाले नाही. प्रत्येक कामात रिंग केली. सल्लागार, ठेकेदार यांचेच आहेत. कामाची टक्केवारी घेऊन थांबले नाहीत. तर, प्रत्येक कामात भाजपचे लोक भागीदार आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकांना आता घरी पाठविण्याची वेळ आली आहे”.

महापालिका इतिहासात स्थायी समिती अध्यक्षाला लाचप्रकरणी अटक

भाजपमुळे महापालिकेची भ्रष्टाचारी महापालिका अशी ओळख झाली. भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला लाचप्रकरणी अटक झाली. उपमहापौराला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली. अशा घटना महापालिका इतिहासात पहिल्यांदाच घडल्या. त्यामुळे शहराची बदनामी झाली. भाजपच्या राजवटीत नागरिकांना शरमेने मान खाली घालावी लागली. सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येईल. अजितदादांनी विरोधकांना कधीच दुय्यम वागणूक दिली नाही. पण, भाजपने अतिशय पक्षपातीपणे काम केले. अर्थसंकल्पावरही बोलून दिले नाही. आम्ही प्रत्येक कामावर प्रखरपणे विरोध केला. पण, बहुमताच्या जोरावर आम्हाला बोलू दिले नाही. येत्या निवडणुकीत भाजपला जागा दाखवून द्यायची असे गव्हाणे म्हणाले.

वसंत बोराटे यांनी राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये का प्रवेश केला, पक्षात त्यांची मुस्कटदाबी केली जात होती. भाजप नगरसेवकांना बिलकुल स्वातंत्र्य नाही. त्यामुळे भ्रष्टाचारी भाजपला सत्तेतून खाली खेचला हवे. अबकी बार सौ पार असा नारा देत या शहरात पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता आणायची आहे,’ असा विश्वास गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबाबत सर्व कार्यकर्त्यांचे शहराध्यक्ष गव्हाणे यांनी आभार मानले.

भाजपने पाच वर्षात केलेल्या पापाची परतफेड जनता निवडणुकीत करेल – बनसोडे

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, अजितदादांच्या नेतृत्वाखाली 15 वर्ष नियोजनबद्ध विकास केला. 2017 पूर्वी भाजपवाले केवळ भ्रष्टाचार शब्दाचा जप करत होते. लोकांना खोटे रेटून सांगितले. पण, मागील पाच वर्षात भाजपने उतमात केला. भ्रष्टाचाराचा अतिरेक केला. स्थायी समितीतील टक्केवारी सर्वजण बघत आहेत. प्रत्येक कामात भाजप पदाधिका-यांचे भाऊ, नातेवाईक, जवळचे लोक भागीदार आहेत. भाजपच्या दबावामुळे महापालिकेत काम करायला ठेकेदार घाबरतात. प्रत्येक कामात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचारविरहित एकही काम केले नाही. भाजपने पाच वर्षात केलेल्या पापाची परतफेड जनता येत्या निवडणुकीत करेल.’

कुत्र्यांच्या नसबंदीत देखील भाजपने पैसे खाल्ले – बहल

माजी महापौर योगेश बहल म्हणाले, महापालिका सभागृह आम्ही नियमाने चालविले. पण, केवळ मोदी यांच्या लाटेत निवडून आलेल्या मंडळींनी लोकशाहीचा गळा घोटला. केवळ 5 मिनिटांत महापालिकेचे सहा हजार कोटीचे बजेट मंजूर केले. प्रत्येक कामात रिंग केली. गेल्या पाच वर्षात भाजपने महापालिका लुटुन खाल्ली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीत देखील पैसे खाल्ले आहेत. अनधिकृत फलक काढण्याचे काम भाजपच्या एका पदाधिका-याला दिले. स्मार्ट सिटीत मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरु असून सर्व मिळून खात आहेत. तांत्रिक मान्यता न घेता कोट्यवधी रुपयांचे काम ठेकेदाराला दिले.

 

राष्ट्रवादीची ताकद दाखवून द्यायची – विलास लांडे

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक विकासकामे झाली आहेत. शहराध्यक्ष पदाची जबाबदारी अजित गव्हाणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. येत्या पालिका निवडणूकीत राष्ट्रवादीची ताकद दाखवून आपल्याला द्यायची आहे. माजी शहाराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मागील पाच वर्षात भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला आणि भ्रष्टाचारी भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.