Pimpri News: आयुक्तांकडून अर्थसंकल्पाचा खेळखंडोबा, तारीख जाहीर करूनही मारली कलटी; इतिहासातील पहिलीच घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला विलंब झाल्याने सत्ताधारी भाजपला सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याची नामी संधी आयुक्त राजेश पाटील यांनी उपलब्ध करुन दिली.  अगोदर 22 तारीख निश्चित झाली असताना घाईगडबडीत 18 तारखेला अर्थसंकल्प सादर करून भाजपला पूरक भूमिका घेतली. मात्र, अर्थसंकल्पाची तारीख जाहीर करूनही आयुक्तांनी कलटी मारली. महापालिकेच्या 40 वर्षाच्या इतिहासातील आयुक्तांनी बजेट सादर केले नसल्याची ही पहिलीच घटना आहे. तर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी अवघ्या दहा मिनिटांत साडेसहा हजार कोटी रुपयांचे बजेट मांडले.  

महापालिकेचा सन 2022-23 या आर्थिक वर्षांचा मूळ 4 हजार 961 कोटी 65 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह  6 हजार 497 कोटी 2 लाख रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ऑनलाइन पद्धतीने आज (शुक्रवारी) स्थायी समितीला सादर केला. कॉन्फरन्स हॉलमधून स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसचिव उल्हास जगताप तर स्थायी समिती सभागृहातून काही सदस्य सहभागी झाले होते. 16 पैकी 12 सदस्य सभेला उपस्थित होते.

अर्थसंकल्पाचा मोठा खेळखंडोबा झाला. सत्ताधा-यांना अर्थसंकल्पात बदल करण्यासाठी अतिशय घाईगडबडीत बजेट सादर केल्याचा आरोप होत आहे. कारण, प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झाली नव्हती. बजेट 11 वाजता सादर केले. तरी, अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेची छपाई झाली नव्हती. साडेबारा वाजता पुस्तिका छापून आणली आणि त्यानंतर ती पत्रकारांना दिली. त्याचबरोबर कोरोनाचा आलेख घसरला असताना, सर्व व्यवहार सुरळित सुरु असताना केवळ राज्य सरकारच्या पत्राचा आधार घेत स्थायी समितीची विशेष सभा ऑनलाइन घेतली. सभेत अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सदस्य काय बोलतात, हे कोणालच कळत नव्हते. आवाज देखील येत नव्हता.

अर्थसंकल्पाची बदलेली तारिख घोषित करून ऐन बजेटच्या दिवशीच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दांडी मारली. त्यामुळे महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांवीना बजेट सादर करण्यात आले. सदस्य संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे यांनी शहराचे बजेट सादर करण्यासाठी आयुक्त का आले नाहीत? याचा खुलासा करण्याची मागणी केली. तर, स्थायी समिती अध्यक्ष लांडगे तहकुबी मांडण्याची सूचना करत होते. पण, कांबळे यांनी खुलासा करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आयुक्त वैयक्तीक कारणासाठी रजेवर असल्याचे सांगितले. त्यावर अंबरनाथ कांबळे यांनी शहराचे बजेट असताना आयुक्तांनी गैरहजर राहणे अतिशय चुकीचे असून खेद व्यक्त केला. त्यानंतर सुजाता पालांडे यांनी अर्थसंकल्पाच्या अभ्यासासाठी ही सभा 23 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला शिवसेनेच्या मीनल यादव यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभा 23 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केल्याचे अध्यक्ष लांडगे यांनी जाहीर केले.

आयुक्तांनी शहरवासीयांना गृहीत धरले?

महापालिकेचे बजेट आयुक्तांनी सादर करणे अपेक्षित असते. आयुक्तांच्या बजेटमधून या मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष असते. महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत महापालिका आयुक्तांनीच बजेट सादर केले आहे. गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तयार केलेले बजेट नव्यानेच आलेल्या आयुक्त राजेश पाटील यांना मांडावे लागले. यावर्षी पाटील यांनी बजेट तयार केले. त्यामुळे त्यांचे पहिलेच बजेट होते. यातून आयुक्तांचे व्हिजन शहरवासीयांना समजणार होते. मात्र, आयुक्त पाटील यांनी शहरवासीयांना गृहीत धरून बजेटच्यादिवशी कलटी मारली. आयुक्त  शहरातील सर्व पक्ष, राजकिय पदाधिकाऱ्यांनी गृहीत धरून बिनदिक्कतपणे ते बजेट न मांडताच रजेवर गेले, अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान, महापालिके आय़ुक्त राजेश पाटील वैयक्तीक कामासाठी रजेवर आहेत. तसेच समाजातिल प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांनी बजेट तयार केले आहे. महिला, वंचित घटक, क्रीडा यांसाठी मोठी तरतुद करण्यात आली आहे, असे सांगत अतिरक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आयुक्तांची बाजू सावरण्याचा केविलवाना प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.