Chinchwad News: ट्राफिक वॉर्डनचे वाहतूक नियमनाऐवजी वाढले इतर प्रताप!

नागरिकांना नाहक त्रास देणा-या ट्राफिक वॉर्डनवर कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत म्हणून ट्राफिक वॉर्डनची नेमणूक केली जाते. मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी काही वॉर्डन नागरिकांची वाहने आडवून चावी काढून घेत दमदाटी करताना दिसतात. यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.

नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्यातर्फे वाहतूक शाखेच्या पोलिसांना मदत करण्यासाठी वॉर्डनची नेमणूक केली जाते. वाहतूक पोलिसांच्या कामात मदत म्हणून तसेच शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वॉर्डनची मदत होईल, या हेतूने ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या संकल्पनेला काही वॉर्डन हरताळ फासत आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, एखाद्या चौकात पाहणी केली असता तिथे वाहतूक पोलीस नसतात. असलेच तरी एखाद्या टपरीवर किंवा झाडाखाली फोनवर बोलत असतात. ट्राफिक वॉर्डन वाहतुकीचे त्यांच्या सोयीने नियमन करतात. गाडी अडवणे, मास्क बाबत विचारणा करणे, पावती बनवणे, गाडीची चावी काढून घेणे अशी कामे ट्राफिक वॉर्डन करतात. याचा नागरिकांना नाहक त्रास होतो.

काही वॉर्डन नागरिकांना दमदाटीची भाषा वापरतात. रस्त्याच्या मध्यभागी आडवे येऊन गाडी अडवतात. अशा ट्राफिक वॉर्डनवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रदीप नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.