Maval News: माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त समक्ष भेट टाळण्याचे आवाहन

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अभीष्टसोहळा रद्द, सोशल मीडियावरून शुभचिंतन करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी जाऊ नये, त्याऐवजी सोशल मीडिया वरून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

साहेबांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे स्थानिक नेते, पदाधिकारी, पुढारी, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांच्या उत्साहाला यावेळी आवर घालावा आणि साहेबांना भेटायला जाऊ नये, घरूनच साहेबांचे शुभचिंतन करावे, असे आवाहन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार यांनी केले आहे. ‘एमपीसी न्यूज’च्या प्रतिनिधीशी ते बोलत होते.

शेलार पुढे बोलताना म्हणाले की, मावळभूषण, शिक्षणमहर्षी, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार कृष्णरावजी भेगडे साहेब  हे येत्या 10 ऑगस्ट रोजी वयाची 84 वर्षे पूर्ण करून 85 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. दरवर्षी त्यांचा “अभीष्टचिंतन सोहळा” आपण उत्साहपूर्ण वातावरणात व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करतो व त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी सुयश व अभीष्टचिंतन चिंतित असतो.

आपल्या सर्वांच्या प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वादाच्या जोरावर भेगडे साहेब उद्या वयाच्या 85व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मावळ परिसरातील सर्व जनतेच्या हितासाठी परमेश्वराने आजवर त्यांच्याकडून शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय यांसारख्या विविध क्षेत्रात कार्य करून घेतले आहे. त्याबद्दल परमेश्वराचे चरणी विनम्र अभिवादन करायलाही शेलार विसरले नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अभीष्टचिंतन सोहळा रद्द केल्याचे सांगून शेलार यांनी सांगितले. आजवर आपण साहेबांना भरभरून प्रेम दिले. आपल्या शुभेच्छा, अभीष्टचिंतन भेगडे साहेबांप्रती प्राप्त झालेले आहे. कोरोनावर यशस्वी मात करून आपण पुन्हा एकमेकांच्या मदतीने यशाची शिखरे गाठणार आहोत, याची आम्हा सर्व मंडळींना खात्री आहे. कोरोनाच्या दृष्टीने सर्व खबरदारी पाळून काळजी घ्या, ह्याच साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्यासाठी जाऊ नये, प्रकृती अस्वस्थ्यामुळे डाॅक्टरांनी साहेबांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपण कोणीही भेटायला जाऊ नये. असे नंदकुमार शेलार यांनी सांगितले.

यावर्षी आपल्या संपूर्ण देशावर कोरोना  महामारीचे संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत  भेगडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, आप्तेष्ट व नातेवाईक यांनी त्यांना प्रत्यक्ष न भेटता त्यांच्याबद्दलच्या सदिच्छा, अभीष्टचिंतन व शुभेच्छा घरी बसूनच आपण व्यक्त कराव्यात, असे नम्र आवाहनही सर्व संस्थांच्या वतीने शेलार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.