Maval News : मावळात बैलगाडा शर्यतीचे आयोजन; 21 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शिवणे गावात रविवारी (दि. 11) बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले. याप्रकरणी 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश दत्तात्रय म्हस्के (वय 27, रा. शिवणे ता. मावळ), हनुमंत शिवाजी म्हस्के (वय 25, रा. शिवणे ता. मावळ), विक्रम बाळासाहेब केडे (वय 30, रा. शिवणे ता. मावळ), आदिनाथ बाळू गराडे (वय 27, रा धामणे, ता. मावळ), आदिनाथ बाळू म्हस्के (वय 23, रा. शिवणे, ता. मावळ), मनोज अंकूष ढोरे (वय 22, रा. मळवंडी ढोरे) आणि अन्य 10 ते 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अषिश काळे यांनी याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 11) सकाळी 10 वाजताच्या सुमारास आरोपी गणेश म्हस्के याच्या मालकीच्या जागेत बैलगाडा शर्यतीच्या घाटात आरोपींनी बैलगाडा शर्यतीस बंदी असताना देखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले. बैलांना यातना पिडा होईल अशा प्रकारे क्रूरतेने व निर्दयपणे वागवून बैलगाडीला जुंपुन बैलगाडीसह चढणीच्या रस्त्याने घाटात चढाला त्यांच्या क्षमतेपेक्षा व ताकदीपेक्षा जास्त त्रास देऊन बैलांचा छळ केला. तसेच कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदी आदेषाचे उल्लंघन केले.

बैलगाडा शर्यत बेकायदेशीरपणे आयोजित केल्याची माहिती वडगाव मावळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी पोलीस हवालदार आशिष काळे आणि त्यांचे सहकारी शर्यतीच्या ठिकाणी गेले. तिथे पोलिसांनी बैलगाडा शर्यत थांबवण्यास सांगितले असता आयोजकांनी व आरोपींनी शर्यत थांबवली नाही.

याप्रकरणी प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा कायदा कलम 1960 चे कलम 11 (1), (क), भारतीय दंड विधान कलम 269, 188, 34, साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1897 चे कलम 2,3,4, कोविड 19 उपाय योजना अधिनियम 2020 चे कलम 11 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119,37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.