Maval News: कर्जतमध्ये ‘शिवसृष्टी’,  नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराच्या कामाचा खासदार, आमदारांच्या हस्ते प्रारंभ

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत शहरात साकरण्यात येणारी ‘शिवसृष्टी’,  कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर तिर्थरुप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने उभारण्यात येणा-या प्रवेशद्वारासह विविध सात कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कामांचे आज (मंगळवारी) भूमिपूजन झाले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”कर्जत-खालापूर परिसरात सर्वाधिक विकास कामे होत आहेत. तिर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे समाजासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी रायगडपासून सुरु केलेली प्रबोधनाची चळवळ राज्यभर पोचली. त्यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्काराने देखील गौरव करण्यात आला. या परिसराचा विकास करत असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठा निधी कर्जत शहराला मिळाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून माझ्या विनंतीनुसार भुसेगाव ते कर्जतला जोडणा-या रेल्वे अंडरपासच्या कामासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची अंडरपासची असलेली मागणी पूर्णत्वाकडे जात आहे. या सर्व विकासकामांसाठी शिंदे यांचे मोठे सहकार्य लाभले. कर्जत शहरातून वाहणा-या उल्हास नदीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उभा केला जाईल. आगामी काळात नदी संवर्धनाचे कामही मार्गी लावले जाईल”.

आमदार थोरवे म्हणाले,  ”राज्य सरकारच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यातून कर्जत शहरात विकास कामे होत आहेत. आतापर्यंत कधीच झाला नव्हता. तेवढा विकास होत आहे. निधी आणण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांचे मोठे सहकार्य लाभले. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने प्रवेशद्वार होत आहे. ही कर्जतवासीयांसाठी आनंदाची बाब आहे”.

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी म्हणाल्या, ”कर्जत शहरात पहिल्यांदाच एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शहरासाठी भरघोस निधी मिळाला. त्यामुळे मी शहराच्या वतीने राज्य शासनाचे आभार मानते”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.