Chakan Crime News : कंपनीतील कॅन्टीन चालकाकडून खंडणी मागत मॅनेजरचे अपहरण करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीतील कॅन्टीन चालकाकडे दरमहा 25 हजारांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कॅन्टीनच्या मॅनेजरचे अपहरण केले.

ही घटना सोमवारी (दि. 23) सकाळी एचपीसीएल कंपनीसमोर घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

राहूल राजाराम कान्हूरकर (वय 26), अक्षय विनय खलाटे (वय 24, दोघे रा. बहुळ, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिवाजी नरसू पाटील (वय 56, रा. महाळुंगे ता. खेड) असे अपहरण आणि सुटका झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एचपीसीएल कंपनीमधील कॅन्टीनमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास दोघेजण त्यांच्याकडे आले. त्यांनी कॅन्टीन संदर्भात बोलायचे असल्याचे सांगून फिर्यादी यांना कंपनीसमोर नेले. तिथे एका कारमध्ये (एम एच 14 / जे पी 5666) बसून त्यांना ‘तू तुझा सर्व स्टाफ घेऊन निघून जायचे. तू कॅन्टीन चालू ठेवले तर तुला गोळ्या घालीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्यासमोर त्यांच्या कॅन्टीनच्या मालकाला आरोपींनी फोन केला. ‘मी तुझ्या मॅनेजर 15 मिनिटाच्या आत तू कंपनीला लेटर देऊन तू कंपनी सोडायची. नाहीतर तुझ्या माणसाला ठार मारीन’, अशी आरोपींनी फिर्यादी यांच्या कॅन्टीनच्या मालकाला धमकी दिली. ‘ या अगोदरचे कॉन्ट्रॅक्टर मला दर महिन्याला 25 हजार रुपये देत होते. तू मला महिन्याला 25 हजार रुपये दे’ असे म्हणत आरोपींनी खंडणी मागितली.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी अपहरण केलेल्या फिर्यादी यांना सोडून पळ काढला. मात्र, पोलिसांकडे कारचा नंबर होता. आरोपी त्यांच्या कारमधून तळेगाव चौक, चाकण येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकात सापळा लावून 20 लाखांच्या कारसह दोघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपींना महाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड, गिरीष चामले, पोलीस अंमलदार आढारी, सानप, चव्हाण, मोरे, भालचिम, कोळकर, हनमंते, नांगरे, बाळसराफ, ढाकणे, जैनक, जाधव, आगलावे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.