Maval : पक्षाने पुन्हा अन्याय केला, आता मावळच्या जनतेकडे न्याय मागणार – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज – प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने आपल्यावर पुन्हा अन्याय केला आहे. त्यामुळे आता मावळच्या जनतेकडे न्याय मागण्याशिवाय आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना व्यक्त केली.

मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल रवींद्र भेगडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रवींद्र भेगडे हे आज (गुरुवारी) सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत ‘अपक्ष’ म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे मावळात भारतीय जनता पक्षात बंडाचे निशाण फडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून वारंवार जाणीवपूर्वक अन्याय होऊनही आपण प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत राहिलो. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते मावळात नवीन चेहरा देऊन न्याय देतील, अशी आशा वाटत होती, मात्र ती फोल ठरली आहे. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून मावळच्या जनतेच्या दरबारात न्याय मागण्याचा निर्णय आपण कार्यकर्त्यांशी बोलून घेतला आहे, असे रवींद्र भेगडे यांनी सांगितले.

कोणत्या तरी अन्य राजकीय पक्षाची उमेदवारी स्वीकारणार असल्याच्या चर्चेचा भेगडे यांनी इन्कार केला. आपण अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.