Pune : ‘कॉप फ्री जंक्शन’ योजनेत वाहतूक पोलीस नाही दिसणार ! ..पण बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई तर होणार !

पुणे शहरातील 23 चौकात ‘कॉप फ्री जंक्शन’ योजना

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील प्रमुख 23 चौकांमध्ये आता ‘कॉप फ्री जंक्शन’ योजना कार्यान्वित केली जाणार असून आता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच संगणकीय प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.

ज्या चौकात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे अशा चौकांची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. परदेशामध्ये महत्त्वाचे चौक तसेच रस्त्यांवर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर संगणकीय प्रणाली तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येते. अशी यंत्रणा आपल्याकडे राबवता येऊ शकते का, याची पाहणी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात मध्यभागातील 23 चौक निश्चित करण्यात आले.

मध्यभागातील बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, हुतात्मा चौक (बुधवार पेठ) तसेच डेक्कन भागातील चौकात या योजनेअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बसविण्यात आलेले आहेत. त्याशिवाय या योजनेत अतिरिक्त ६० ते ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांची जोडणी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी करण्यात येणार आहे. त्यासाठी विशिष्ट अशा संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून नियमभंग करणारा वाहनचालक अगदी अचूकपणे पकडला जाईल. त्याचा वाहन क्रमांक तसेच छायाचित्र, चित्रीकरण नियंत्रण कक्षातील यंत्रणेत पाठवले जाईल. त्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची माहिती संकलित केली जाईल. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची देखील नेमणूक करण्याची गरज राहणार नाही.

“ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर पोलिसांवरचा ताण कमी होईल तसेच नियमभंग करणाऱ्यांकडून पोलिसांबरोबर घालण्यात येणारे वादावादीचे प्रमाण निश्चितच कमी होईल. संगणकीय प्रक्रिया तसेच या योजनेसाठी लागणाऱ्या यंत्रणेसाठी काही कंपन्यांबरोबर चर्चा सुरू असून निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आहे” अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.