Talegaon Dabhade : माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे ज्येष्ठांचा स्नेहमेळावा रंगला उत्साहात

एमपीसी न्यूज- माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या द्वितीय वर्धापनदिन दिनानिमित्त तसेच ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.7) वैशाली मंगल कार्यालयात मावळ तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मावळ तालुक्यातील सुमारे 2000 महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन प्रसारक मंडळाचे खजिनदार सुरेशभाई शहा होते. स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर,पांडुरंग कार्लेकर व ठेरंगे यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल व ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर गराडे (धामणे) यांचा माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष दादा डफळ, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, गणपत काळोखे, यशोधर धारणे, गणपत शेडगे, विठ्ठल कांबळे, श्रीकृष्ण मुळे, दशरथ ढोरे, शंकरराव शेळके, बाबा शेख, रघुनाथ लोहर आदि उपस्थित होते.

विडंबनकार व हास्य कवी बंडा जोशी, कॉमेडीची बुलेट ट्रेन कलाकार राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडेकर, चला हवा येऊ द्या कलाकार योगेश सुपेकर तसेच प्रसिद्ध गायक शेखर गरुड व अश्विनी कुरपे आदींचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.

माय माऊली फाउंडेशनचे संस्थापक सुनील शेळके यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ” ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभव व मार्गदर्शनातूनच देशाचा विकास होतो. ज्येष्ठ नागरिक व युवक संवाद दुरावत असून हा संवाद वाढविणे काळाची गरज आहे. माय माऊली फाउंडेशनच्या वतीने मावळ तालुक्यातील अनाथ, गरीब व गरजू निराधार व्यक्तींना मोफत जेवण, आरोग्य तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या कार्याची जाणीव ठेवून त्यांना सन्मान देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे” समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद कायम मिळावेत यासाठीच ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव अग्रेसर राहणार असल्याचे ते म्हणाले. माय माऊली जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने नोंदणीकृत सर्व सदस्यांना किमान 20% वैद्यकीय सुविधांत सवलत देण्यात येईल असे शेळके यांनी यावेळी जाहीर केले.

स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले. सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. तर आभार नगरसेवक संदीप शेळके यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.