Vadgaon Maval : एमआयडीसी टप्पा क्र 4 ची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुनील शेळके

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्र 4 (निगडे, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी) संदर्भात असलेल्या शेतक-यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून 32 (1) ची अंमलबजावणी पुढील आठवड्यात (दि 31) पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी शनिवार (दि 23) रोजी वडगाव मावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

या पत्रकार परिषदेला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके यांनी निगडे, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी ह्या औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्र 4 ची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. या गावांना प्रत्येकी 25 एकर जागा मिळावी, ग्रामस्थांसाठी आरोग्य सेवा, पाणीपुरवठा व सुसज्ज रस्ते आदी गोष्टींची पूर्तता व्हावी व प्रामुख्याने त्याच गावातील स्थानिकांसाठी औद्योगिकीकरणामध्ये रोजगाराची संधी मिळावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती.

त्यानुसार उद्योगमंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत गावाला 25 एकर भूखंड देण्याचे मान्य करण्यात आले असून घनकचरा व स्मशानभूमीसाठी 5 एकर जागा, आय टी आय केंद्रासाठी पाच एकर जागा तसेच रस्ता, पाणीपुरवठा व रूग्णालयासाठी जागा देण्याचेही मान्य करण्यात आल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

टप्पा क्र 4 च्या औद्योगिक  क्षेत्रात लेकसिटी, इलेक्ट्रॉनिक पार्क, इंडस्ट्रीज होणार असून ग्रामस्थांनी भूलथापांना बळी न पडता एकविचाराने  एक दिलाने राहून फायदा घ्यावा असे आवाहन ही आमदार शेळके यांनी केले.

स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीचा विचार व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यास यश आले असून 32(1) ची अंमलबजावणी पुढील आठवड्यात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला.

कातवी हद्दीतील जमीनींवर  काही वर्षांपूर्वी एमआयडीसीचे आरक्षण पडले होते. तेव्हापासून संबंधित जमिनीच्या 7/12 उता-यावर शिक्के होते. ती जमीन एमआयडीसीने वगळण्याचा निर्णय घेतला असून लवकरच 7/12 उता-यावरील एमआयडीसीचे शिक्के काढण्यात येतील असे ही आमदार शेळके यांनी सांगितले.

त्याच बरोबर जनरल मोटर्स कंपनीने कंपनी बंद करण्याचा दिलेला प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारने फेटाळून लावत कामगारांच्या बाजूने न्याय देत कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विशेष भूमिका घेतली असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले आहे. 1600 कायमस्वरूपी कामगारांबरोबर इतरही कामगारांचा प्रश्न तुर्तास सुटला आहे, मात्र कंपनी व्यवस्थापन न्यायालयात दाद मागू शकते. त्यामुळे कामगारांनी याबाबत एकजूटीने सामोरे जावे असे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.