Maval News : आमदार सुनील शेळके यांचा शब्द खाली पडून देणार नाही, ते मागतील त्या योजनेला मंजुरी देतोय – मंत्री जयंत पाटील

एमपीसी न्यूज – मावळ वासीयांनी आमदार सुनील शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरभरून प्रेम केले आहे, म्हणूनच तुमच्या आमदारांचा शब्द खाली पडून देणार नाही. ते मागतील त्या योजनेला मंजुरी देऊन निधी देत आहे. त्यांनी मागणी केल्यामुळेच आंद्रा धरणातून बंदिस्त पाईपलाईन पाण्याच्या प्रस्तावास तात्काळ मंजूरी देत असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ह्या तरूणाला भविष्य आहे, संयम आहे, तो पुढे जातोय, त्याला जपण्याचे काम करा. माणसातला माणूस, सर्वांच्याच हितासाठीच तुम्ही त्याला निवडून दिलेत. त्यामुळेच त्यांच्या कोणत्याही कामाला होकार द्यावाच लागतो. विरोधी पक्षाच्या माजी मंत्र्याला एक लाखाच्या मताच्या फरकाने पराभूत केले आणि मोठा विजय मिळविला. असे तरूण व संयमी मावळचे आमदार सुनिल शेळके यांना भविष्य आहे, संयम आहे, तो पुढे जातो आहे. त्याला जपण्याचे काम करा. असे गौरवोद्गार काढत मंत्री जयंत पाटील यांनी आमदार शेळके यांचे तोंडभरून कौतूक केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात शनिवारी (दि. २६) पाचव्या दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. मावळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीला माजी आमदार कृष्णराव भेगडे, आमदार सुनील शेळके, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, महिला सरचिटणीस संगिता साळुंके, तालुकाध्यक्ष बबन भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे,सुभाष जाधव,विठ्ठल शिंदे, गणेश आप्पा ढोरे,जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, गणेश काकडे, गणेश खांडगे, किशोर भेगडे,संतोष भेगडे, अंकुश आंबेकर, बाबुराव वायकर, दीपक हुलावळे, साहेबराव कारके,मयुर ढोरे, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, वैशाली दाभाडे, शोभा कदम, रूपाली दाभाडेसह तसेच लोणावळा, तळेगाव नगरपरिषदेचे आजी माजी पदाधिकारी तसेच राष्ट्रवादीचे सर्व सेलचे पदाधिकारी, वडगाव व देहू नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एक एक कार्यकर्ता जोडला जात असून आज आपला पक्ष तळागाळात उभा होत आहे. आज पक्षाकडे तरुणांची मोठी फळी निर्माण झाल्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा राष्ट्रवादीमय असणार असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आपल्या पक्षात आता सुनील शेळके, रोहित पवार, निलेश लंके असे तरुण लोक जबाबदारीने नेतृत्व करत आहेत. तुमच्या सर्वांच्या ताकदीने सुनील अण्णा जवळपास एक लाख मतांच्या लीडने निवडून आले आहेत असे बोलून जयंत पाटील यांनी सर्व मावळवासीयांचे आभार मानले. तसेच आमदार सुनील शेळके यांनी आजवर आपल्या मतदारसंघासाठी 900 कोटींचा निधी मिळवला आहे. अजून अडीच वर्षे बाकी आहेत. अण्णा हा माणसासाठी झटणारा नेता आहे. संकटाचा काळ संपून मावळच्या प्रगतीचा काळ सुरू झाला आहे. सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळचा विकास नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मावळाच्या भूमीने आपल्याला शिवरायांचे शौर्य सांगितले आहे. दिल्लीश्वर कितीही कपटी असला कितीही कारस्थानी असला तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. ही परंपरा शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू आहे, ती यापुढेही कायम राहील असा दावा जयंत पाटील यांनी केला.

पुढे केंद्रीय जुलमीशाहीचा पाढा वाचताना ते म्हणाले की, आपले सरकार काहींच्या डोळ्यात सलत आहे, त्यामुळे आधी आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मंत्र्यांवर धाडी टाकल्या जात आहे. अनिल देशमुख यांना खोट्या आरोपात गोवलं, नवाब मलिक यांना खोट्या आरोपात गोवलं, मलिक एनसीबी विरोधात बोलत होते म्हणून त्यांना त्यांची भूमिका मांडू न देता त्यांना अटक करण्यात आली. जाणीवपूर्वक दाऊदचं नाव घेतले गेले आणि एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला तुरुंगात टाकले, अशी टीका पाटील यांनी केंद्रीय सत्ताधाऱ्यांवर केली. मात्र महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेवर आले आहे. त्यामुळे कोणीही कितीही अडथळे आणले तरी देखील महाराष्ट्र सरकार आपले काम पूर्ण करणार, अशी खात्री मंत्री जयंत पाटील यांनी सर्व उपस्थितांना दिली.

मुख्यमंत्री करण्याची संधी राष्ट्रवादी पक्षाकडे आली होती. पण आघाडीत एकत्रित काम करायचं होते म्हणून ती संधी आपण सोडून दिली असे मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आयोजित तळेगाव येथील सभेत ते बोलत होते. 2024 च्या विधान सभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी हा पक्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून जास्तीतजास्त आमदारांना निवडून आणायचे असून ती भेट शरद पवारांना द्यायची आहे. असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

महाराष्ट्रात 2024 विधान सभेच्या निवडणुकीत सर्व जागा निवडून आणण्याची जिद्द कार्यकर्त्यांनी बाळगली पाहिजे. शरद पवार यांनी पक्षासाठी उभं आयुष्य वेचले आहे. आजही शरद पवार 18 ते 20 तास काम करत आहेत. हे सर्व आम्ही पाहात आहोत. त्या पवार साहेबांना 2024 च्या विधान सभेची सगळ्यात मोठी भेट द्यायची म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत.

सर्वांनी एक विचाराने रहा. येणा-या लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषदसह मावळातील जिल्हा परिषद सहा गट व पंचायत समितीचे 12 गटातील सर्वच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होईल असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.

स्वागत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांनी केले तर सूत्रसंचालन निवेदक भाऊसाहेब कोकाटे तर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.